

सेलू (छत्रपती संभाजीनगर) : मराठवाड्यातील फळबाग क्षेत्रात सध्या बुरशीजन्य रोगांचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला. मोसंबी, संत्रा, लिंबू उत्पादक शेतकर्यांचे उत्पादन व उत्पन्न दोन्ही धोक्यात आले. या पार्श्वभूमीवर सेलू तालुका दबाब गटाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन पाठवून फळबाग रोग प्रतिबंधक यंत्रणा अद्यावत करण्याची मागणी केली आहे.
परभणी, जालना, संभाजीनगर जिल्ह्यांतील हजारो शेतकरी मोसंबी, संत्रा व लिंबूची लागवड करतात. मात्र तीन-चार वर्षांपासून बुरशीसदृश रोगांचा फैलाव झाल्याने फुलगळ, फळगळ, उत्पादनात घट यासारख्या गंभीर समस्या उदभवत आहेत. यामुळे शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दबाब गटाच्या म्हणण्यानुसार याकडे परभणी कृषी विद्यापीठ व जिल्हा कृषी विभागाने दुर्लक्ष केले. विद्यापीठातील संशोधन केंद्र हे निष्क्रिय असून अद्याप या रोगावर एकही ठोस उपाययोजना समोर आलेली नाही, असे निवेदनात नमूद केले. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र असंतोष आहे. दबाब गटाने मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात फळबाग रोग प्रतिबंधक यंत्रणा तातडीने अद्यावत करावी, परभणी कृषी विद्यापीठात चालू संशोधन केंद्र कार्यक्षम करावे, इतर विद्यापीठांतील तज्ज्ञांची मदत घेऊन विशेष संशोधन मोहिम राबवावी, शेतकर्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि अनुदानित औषधे पुरवावीत अशा विविध मागण्या केल्या.
निवेदनावर श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, सतीश काकडे, गुलाब पौळ, देवराव दळवे, योगेश सूर्यवंशी, अजीत मंडलिक, दिलीप मगर, मुकुंद टेकाळे, भारत झाल्टे, रामचंद्र कांबळे, अक्षय बुरे, सुभाष काकडे, तुकाराम मगर आदींसह 40 हून अधिक शेतकर्यांच्या सह्या आहेत. दबाब गटाच्या या निवेदनाची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कृती करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.