

Faizal Teja Firing on girlfriend
छत्रपती संभाजीनगर : कुख्यात गुन्हेगार फैजल तेजाने त्याच्या मैत्रिणीवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.११) रात्री अकरा ते साडेअकराच्या सुमारास किलेअर्क भागात घडली. यात तरुणीच्या हातावर गोळी लागल्याने ती गंभीर जखमी असून तिला घाटीत दाखल केले आहे. दरम्यान, तिने देखील वर्षभरापूर्वी हवेत गोळीबार केल्याने सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. तिच्या टीव्ही सेंटर भागातील घरातून दोन चाकू, पिस्तूल जप्त केले होते.
अधिक माहितीनुसार, तेजाने काही महिन्यापूर्वी टीव्ही सेंटर येथे एका रिक्षाचालकावर हत्याराने हल्ला चढविला होता. त्या गुन्ह्यात तो हर्सूल जेलमध्ये कैद होता. तो नशेच्या गोळ्या, सिरप, गांजाचा व्यवसाय करत असल्याने अनेकवेळा जेलची वारी करून आलेला आहे. तो हर्सूल जेलमध्ये स्थानबद्ध असताना तेथून नशेचा धंदा चालवीत असल्याचे देखील उघडकीस आले होते. काही दिवसांपूर्वी तो जेलमधून सुटला होता.
दरम्यान, त्याने यापूर्वी देखील मैत्रिणीवर हल्ले केलेले आहेत. सोमवारी रात्री त्याने मैत्रिणीवर थेट गोळी झाडली. यात तरुणी गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर लगेच गुन्हे शाखेचे अधिकारी देखील दाखल झाले होते. तेजाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. रात्री उशिरा पर्यंत गोळीबारीचे कारण समोर आलेले नव्हते.
मैत्रिणीला देखील वर्षभरापूर्वी हवेत गोळीबार केल्याने सिटी चौक पोलिसांनी अटक केली होती. तिच्या टीव्ही सेंटर भागातील घरात दोन चाकू, पिस्तूल जप्त केले होते. ती पोलिसाची मुलगी असून कुख्यात तेजा आणि टिप्याची जुनी मैत्रीण देखील आहे. त्यांच्यात नंतर बरेच वाद झाल्याने चांगलेच बिनसले होते.
जेलमधून सुटल्यानंतर अगोदर टिप्याने लुटमार केल्याने फरार आहे. पुंडलिक नगर पोलिसांना तो अजूनही सापडलेला नाही. त्यानंतर आता तेजाने जेलच्या बाहेर येताच जुन्या मैत्रिणीवर गोळी झाडल्याने दोन्ही गुन्हेगार पोलिसांची डोकेदुखी बनले आहेत. मोक्का, स्थानबद्धतेची कारवाई करूनही त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. चार सहा महिने जेलमध्ये राहुल बाहेर येताच नवे कांड करण्यात दोघे सराईत आहेत.