

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम मंगळवारी आयोगाने जाहीर केला. त्यानुसार बुधवारी (दि.१५) मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात पहिली बैठक पार पडली असून, येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत २९ प्रभागांची येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत २९ प्रभागांची प्रारूप मतदार यादी तयार करून प्रसिद्ध करण्याच्या सूचना दिल्या. त्यासोबतच प्रभागनिहाय २९ पथकेही नियुक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
राज्यात सर्वात शेवटी महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र असे असले तरी शासन आणि निवडणूक आयोगाच्या सूचना व कार्यक्रमानुसार महापालिकेने निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे. यंदा वॉर्डोंऐवजी प्रभागनिहाय निवडणुका होत आहेत. त्यामुळे आयोगाच्या सूचनेने महापालिकेने ११५ वॉर्डाचे २९ प्रभाग केले असून, यातील २८ प्रभाग हे चार वॉर्डाचे तर शेवटचा २९ वा ३ वॉर्डाचा करण्यात आला आहे. आयोगाने मंगळवारी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार बुधवारपासूनच महापालिका प्रशासनाने पुढील कामकाजाला सुरुवात केली आहे. सिडकोतील अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात महापालिकेने निवडणुकीसाठी पहिली कार्यशाळा घेतली. यात विभागप्रमुख, वॉर्ड अभियंते, लिपीक असे १५० अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.
विधानसभेची मतदार यादी उपलब्ध महापालिकेच्या अगामी निवडणुकीसाठी विधानसभा निवडणुकीची मतदार यादी वापरली जाणार आहे. बुधवारी झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेने याद्या तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही यादी उपलब्ध करून देत त्यावर कशा पद्धतीने काम करायचे, याबाबत सूचना केली. त्यामुळे या मतदार यादीचा आधार घेत महापालिकेचे पथक प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करणार आहे.
२९ पथकात ११६ कर्मचारी
मतदार यादी तयार करण्यासाठी २९ प्रभागांसाठी २९ पथके तयार केली आहेत. त्या प्रत्येक पथकामध्ये ४ अधिकारी-कर्मचारी यानुसार ११६ जणांचा समावेश राहणार आहे. हे पथक प्रारूप मतदार यादी तयार करून मनपा निवडणूक विभागाला सादर करेल. त्यावर सूचना व हरकती मागविल्या जातील.
यादी तयार करण्यासाठी २१ दिवसांचा अवधी
महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्यासाठी केवळ २१ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानुसार ६ नोव्हेंबरला ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर सूचना हरकती नोंदविण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर पंचनामे करून दुरुस्तीसह २८ नोव्हेंबरपर्यंत मतदार यादीत अंतिम केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.