

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपच्या तयारीचा आढावा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या बैठकीत दिलेल्या सूचनांची प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्तता केली का, यासंदर्भातील आढावा गुरुवारी (दि.१६) प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेणार आहेत. पाच दिवसांतच भाजप दुसरी विभागीय बैठक घेत असल्याने स्वबळाच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
भाजपने यंदा राज्यभरातील सर्वच महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका काबीज करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यासाठी मागील आठवडाभरापासून भाजपने राज्यभरात जोर बैठका सुरू केल्या आहेत. राज्यात काही ठिकाणी स्वबळाचा अंदाज घेतला जात आहे तर महायुतीचा धर्म पाळण्याच्या सूचना देखील काही शहरातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत सर्वचा जिल्ह्यात आढावा घेतला जात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये १० ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता, पदाधिकारी बैठक घेण्यात आली. त्यात विभागातील आठही जिल्ह्यांना सुमारे ४५ ते ५० मिनिटांचा वेळ देण्यात आला. या बैठकीत अनेक तालुक्यांनी स्वबळाचा रेटा मुख्यमंत्र्यांपुढे लावून धरला. त्यावर त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्वबळाचे गणित समजून सांगण्याची सूचना केली होती. अनेक ठिकाणाहून हीच मागणी होत असल्याचे पाहून मुख्यमंत्र्यांनी स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत.
दरम्यान, शुक्रवारी बैठकीत पदाधिकाऱ्यांना ज्या सूचना करण्यात आल्या होत्या, त्या पूर्ण झाल्या की नाही, यासंदर्भातील आढावा आजच्या विभागीया बैठकीत प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे घेणार असल्याने पदाधिकाऱ्यांचे याकडे लक्षा लागल आहे.