

छत्रपती संभाजीनगर : शहराला वाढीव पाणी मिळण्यासाठी टाकण्यात आलेल्या नऊशे मि.मी.ची जलवाहिनीची आज बुधवार (दि.६) पासून चाचणी घेतली जाणार असून शहराच्या पाण्यात ६५ ते ७० एमएलडी वाढ होणार आहे.
शहराला दररोज साधारणपणे १७० ते१७५ एमएलडी पाणी मिळणार असून जीर्ण झालेली ५६ दललि क्षमतेची योजना बंद ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या २७४० कोटी रुपयाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेमधून १९३ कोटी रुपये खर्चाची ७५ एमएलडी पाण्यासाठी ९०० मि.मी.ची योजना विण्यात आली. यासाठी फारोळा येथे २६ एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले. या प्रकल्पाचे काम रेंगाळल्याने शहरवासीयांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या. ही योजना पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ठेकेदार एजन्सीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर ही योजना पूर्ण झाली. अखेर नऊशेची योजना पूर्ण क्षमतेने राबविण्यासाठी २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची बुधवारपासून चाचणी घेतली जाणार आहे. या प्रकल्पात पाण्यावर योग्यरितीने शुद्धतेची
प्रक्रिया करून हे पाणी नक्षत्रवाडी येथील एमबीआरमध्ये आणले जाणार आहे. त्यासाठी पंप बसविण्यात आले आहे. त्यामुळे शहराला दररोज ९०० च्या योजनेतून ६५ ते ७० एमएलडी पाणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात १६५ ते १७० एमएलडी पाणी येणार आहे. त्यामुळे पाण्याचा गॅप कमी होण्यास मदत होणार असून चार किंवा पाचा दिवसांआड पाणी मिळण्याची अपेक्षा असल्याने शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
चार ते पाच दिवस चालणार चाचणी- फारोळा येथील २६ 66 एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची चाचणी घेण्याचे काम सुरू झाले आहे. मंगळवारी (दि.५) यामध्ये पाणी घेऊन ते स्वच्छ करण्यात आले. बुधवारपासून चाचणी सुरू होईल. साधारणपणे चार ते पाच दिवस चाचणी घेऊन त्यानंतर पूर्ण क्षमतेने नऊशेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरू केला जाईल.
तुषार टेकवाडे, कार्यकारी अभियंता.
शहरसाठी टाकण्यात आलेली नऊशेची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने राबवली जाणार आहे. त्यामुळे ५६ दललि क्षमतेची योजना बंद केली जाणार आहे. मात्र अचानक काही अडचण निर्माण झाली तर या योजनेतून पाणी घेतले जाणार आहे.