

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराला मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी मिळावे, याबाबत मुंबईतील मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.10) बैठक झाली. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सादरीकरण केले. महापालिकेला किती पाणी दिले जाते. त्याचा वापर कसा केला जातो, त्याचे ऑडिट करण्याचे आदेश मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना दिले आहेत.
बैठकीत जलसंपदा विभागाचे सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुनाले, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता दीपक पाटील आदी उपस्थित होते. आयुक्त सिंह यांनी मुळशी धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी का आवश्यक आहे, याचे सादरीकरण केले.
सध्या पवना धरणातून महापालिका 530 एमएलडी, आंद्रा धरणातून 80 एमएलडी, एमआयडीसीकडून 20 एमएलडी असे एकूण 630 एमएलडी पिंपरी-चिंचवडला मिळत आहे. शहराच्या लोकसंख्यावाढीचा वार्षिक 7 टक्के दर लक्षात घेता, भविष्यात 814 एमएलडी पाण्याचा तुटवडा जाणवेल. त्यामुळे मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी आरक्षित करण्याबाबत महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे, असे आयुक्तांनी सादरीकरणात सांगितले.
त्यानंतर जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी पिंपरी चिंचवडच्या पाणी वापराचे ऑडिट करण्याचे आदेश दिले. महापालिकेने सादर केलेल्या पाण्यासंदर्भातील अहवालाची पडताळणी मुख्य जल परीक्षकांकडून करून घेण्याचे आदेश दिले. महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करीत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. मुळशी धरणातील गाळ काढण्याचे व धरणाच्या देखभालीसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. सांडपाण्याच्या पुनर्वापरासंबंधी व महापालिकेच्या पाण्याच्या स्रोतांचे ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले. धरणातून आऊटलेटद्वारे बाहेर जाणार्या पाण्याच्या मोजमापासाठी मीटर बसवण्याची सूचना त्यांनी केली.
पाण्याची गरज
पिंपरी चिंचवडच्या झपाट्याने वाढणार्या लोकसंख्येचा विचार करता, सन 2041 पर्यंत होणार्या वाढीव लोकसंख्येसाठी 760 एमएलडी पाण्याची गरज भासणार आहे. त्यासाठी शहराशेजारच्या मुळशी धरणात महापालिकेसाठी 760 एमएलडी पाणी आरक्षित करण्याबाबत महापालिकेने 6 डिसेंबर 2023 ला जलसंपदा विभागास पत्र पाठविले आहे. त्यानंतर राज्य शासनाशी संपर्क साधा, असे पत्र जलसंपदा विभागाने दिले होते. दुसरीकडे, सीमेजवळील हिंजवडी, मान, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे व गहुंजे या सात गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील पाण्याची मागणी व तुटवडा लक्षात घेऊन मुळशी धरणातून पाणी आरक्षित करण्याची मागणी महापालिकेने केली आहे.