

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु यंदा निवडणुकीसाठी १५४० मतदान केंद्र राहणार असून, या केंद्रांवर मंडप, सीसीटीव्ही कॅमेरे इतर सोयीसुविधांसाठी १० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या निधीची तरतूद अगोदरच महापालिकेच्या अर्थसंकल्पात करून ठेवली आहे, अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू आहे. यात आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार महापालिकेकडून प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रभागरचना तयार करणे, मतदार याद्या प्रभागनिहाय तयार करणे, त्यावर हरकती आक्षेप आणि त्याचे निराकरण करून अंतिम यादी तयार करणे, मतदान केंद्र निश्चित करणे, मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदार याद्या प्रसिद्ध करणे, ही कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. बुधवारी मतदार याद्यावरील आक्षेपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता पुढील प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीसाठी महापालिकेने सुमारे १० कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद करून ठेवली आहे.
याबाबत माहिती देताना प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, निधीची तरतूद अगोदरच करून ठेवावी लागते. त्यानुसार अर्थसंकल्पात हा खर्च राखीव ठेवला आहे. यात मतदान केंद्र तयार करणे, स्टेशनरी, मंडप, जेवण, वाहने, मतदान केंद्रावरील व्यवस्था, नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी भत्ता, पोलिस बंदोबस्त, स्ट्रॉग रूमची व्यवस्था यासह सीसीटीव्ही कॅमेरे या सर्व खर्चाचा समावेश त्यात केला असतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच यंदा मतमोजणी, ईव्हीएम ठेवण्यासाठीचे स्ट्रॉग रूम या कामासाठी तीन ठिकाण निश्चित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यंदा १५४० मतदान केंद्र
महापालिकेच्या निवडणुका यंदा वॉर्डऐवजी प्रभागनिहाय होत आहे. वॉर्डनिहाय निवडणुकीसाठी एका मतदान केंद्रावर १३०० ते १३५० मतदार होते. परंतु यंदा प्रभागनिहाय निवडणुका होत आहेत. त्यामुळे एका मतदान केंद्रात ८०० ते ९०० मतदार रा-हणार आहेत. त्यामुळे गेल्यावेळच्या तुलनेत तब्बल अडीच पट म्हणजे १४०८ मतदान केंद्र राहतील. त्यात दहा टक्के वाढीवनुसार कळवावे लागतात. त्यासाठी १५४० केंद्र ठेवले आहेत. २०१५ सालच्या निवडणुकीत ६९९ मतदान केंद्र होते.