

छत्रपती संभाजीनगर : तीसगाव येथील २ हेक्टर ५६ आर जमिनीचे वर्ग २ मधून १ मध्ये रूपांतर करण्यात आले होते. मात्र हे करताना बाजारमूल्य कमी दाखवून २ कोटी १७ लाख रुपयांचा महसूल बुडविल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही रक्कम तीन दिवसांत भरण्याचे आदेश देण्यात आले होते. ती रक्कम न भरल्यामुळे सातबारावर इतर हक्कात त्याची नोंद घेण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी दिले आहेत.
तीसगाव येथील गावठाण नंबर २२५/५ मधील २ हेक्टर ५६ आर क्षेत्राची जमीन भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यात आली. हे करताना शेषराव काळे यांनी या जमिनीचे बाजारमूल्य १ कोटी ५० लाख ९९ हजार रुपये दाखविले. या बाजारमूल्याच्या आधारे वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये जमिनीचे रूपांतर प्रशासनाकडून करून घेतले. त्यानंतर
किशोर राजपूत यांनी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दिली. जिल्हा प्रशासनाने सह-दुय्यम निबंधक कार्यालयाला फेरमूल्यांकन करून घेतले. तेव्हा २०२५-२६ मध्ये या जमिनीचे मूल्य तब्बल १० कोटी २२ लाख ३० हजार १०० रुपये असल्याचे समोर आले. यामुळे काळे यांनी भरलेली कमी रक्कम भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने १० नोव्हेंबर २०२५ ला नोटीस जारी करून ३ दिवसांत उर्वरित रक्कम भरावी, असे सांगितले. मात्र काळे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर जमिनीच्या ७/१२ अभिलेखात इतर हक्कात बोजा म्हणून २.१७ कोटींची नोंद करा व त्याची प्रत जिल्हाधिकारी यांना सादर करा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने काढले आहेत.