

छत्रपती संभाजीनगर : शहरात अवैध दारूविक्रेत्या विरुद्ध राबवण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.
ही घटना ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सिडको परिसरातील सनी सेंटरजवळ घडली. योगेश त्र्यंबक गाडेकर (रा. म्हाडा कॉलनी, चिकलठाणा) असे हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुय्यम निरीक्षक स्नेहल केदारे (३५) ६ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पथकासह सिडको व चिखलठाणा परिसरात अवैध दारूविक्रेत्याविरूद्ध कारवाई करत होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांनी सनी सेंटर येथे एका दारुच्या दुकानाखाली तळमजल्याच्या गाळ्यात अवैधरित्या दारू पिण्यासाठी लोक बसलेले होते. त्यावेळी त्यांनी त्या दुकानदारांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे संतप्त दुकानदाराने तुम्हाला काय करायचे ते करा म्हणत महिला अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला.
परवाना नसल्याने कारवाई
त्या दुकानात बसून दारू पिण्याचा किंवा दारू विक्रीचा परवाना नसल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई दरम्यान दोन-तीन तळीरामांनी येथून धूम ठोकली. दरम्यान दुकानदाराच्या हल्ल्यात केदारे यांच्या चेहऱ्यावर वार लागला आहे. या प्रकरणी सिडको पोलिसांनी गाडेकर विरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करती आहेत.