

गंगापूर ( छत्रपती संभाजीनगर ) : रमाकांत बन्सोड
नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शमल्याने गंगापूर शहरात बुधवारी (दि.३) निवडणुकीनंतरची निवांत हवा अनुभवायला मिळाली. प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरणारे उमेदवार आणि कार्यकर्ते मतदान पार पडताच निवांत असल्याचे दिसले. मात्र पडद्यामागे आकडेमोडीचा खेळ सुरूच असल्याने राजकीय वातावरणात कुजबूज रंगत राहिली.
निवडणुकीत विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी प्रतिष्ठेचा सवाल मांडत जंगी प्रचारयज्ञ राबवला. खासदार आमदारांच्या सभा, कॉर्नर मिटिंग्ज, रॅली, घरदारी भेटी, तसेच लाऊडस्पीकरच्या गजरात १ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराचा जोर टिकून होता. गंगापूर नगरपरिषद निवडणुकीत २९ हजार २८७ पैकी २१ हजार १४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, काही उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीअस्त्र वापरल्याची चर्चाही शहरात तापलेली आहे. मतदानानंतर विविध बूथवरील परिस्थिती, कोणत्या उमेदवाराला किती मते मिळू शकतात, कोणत्या पॅनलचा तोल कुठे झुकेल, याची लगबग कार्यकर्त्यांत दिसत होती. सर्वांच्या नजरा आता २१ तारखेच्या मतमोजणीकडे लागल्या असून, राजकीय वातावरण चुरशीचे झाले आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी, भाजप, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी सकाळचा वेळ कुटुंबासोबत घालवण्याला प्राधान्य दिले.
गेल्या पंधरा दिवसांत रात्रंदिवस प्रच-रारासाठी धावपळ केलेल्या कार्यकर्त्यांनीही सुटकेचा निःश्वास टाकत घरीच विश्रांती घेतली. मात्र दुपारनंतर सर्वच पक्षांची कार्यालये पुन्हा गजबजली. येत्या २१ तारखेला होणाऱ्या मतमोजणीनंतरच गंगापूर नगरपरिषदेतेचे चित्र स्पष्ट होणार असून, सर्वांचे लक्ष निकालावरच खिळले आहे.
अंतिम निकालाचा अंदाज बांधणे कठीण
उमेदवार आणि कार्यकर्ते एकत्र येत मतदानाचा तपशील, बूथनिहाय वातावरण आणि मतदारांच्या कलाबाबत उशिरापर्यंत चर्चा रंगवत राहिले. दरम्यान, अनेक उमेदवारांनी आपण विजयी होणार असल्याचा ठाम आत्मविश्वास व्यक्त केला आहे. काहींनी विश्रांतीला फाटा देत पुन्हा मतदारसंघाचा धावता आढावा घेतला. कार्यकर्त्यांची आकडेमोड सतत सुरू असून, अंतिम निकालाचा अंदाज बांधणे मतदारांनाही कठीण जात आहे.