

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने लाडपागे समितीच्या शिफारशीअंतर्गत दोन दिवसांपूर्वीच १२२ कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत समावून घेतले. या लाभार्थ्यांना समाज कल्याण तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. परंतु, नियुक्तीला दोन दिवसही झाले नाही तोच, या कर्मचाऱ्यांनी सफाईच्या कामाला नकार देत वसुलीचे काम देण्याची डिमांड आपल्या झोन अधिकाऱ्यांकडे केली. त्यामुळे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कधी काय होईल आणि कोणता कर्मचारी काय डिमांड करेल, हे सांगणे अवघड आहे. लाड पागे समितीच्या शिफारशीअंतर्गत स्वच्छतेचे काम करणार्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीनंतर अथवा सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यात येते. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने साफसफाईचे काम केलेले असावे, ही प्रमुख अट त्यात आहे. महापालिकेने याच समितीच्या शिफारशीअंतर्गत गेल्या आठवड्यात संत एकनाथ रंगमंदिर येथे मोठा कार्यक्रम घेऊन १२२ कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र दिले. पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते.
या कार्यक्रमानंतर महापालिकेला दोन दिवस सुट्या होत्या. सोमवारी महापालिकेचे कामकाज सुरू झाले. नवनियुक्त सर्व कर्मचारी हे कार्यालयीन आदेशानुसार झोन कार्यालयांमध्ये रुजू झाले. या सर्वांना चतुर्थश्रेणीमध्ये नियुक्ती देण्यात आली होती. त्यानुसार त्यांना साफसफाईचे काम करणे गरजे आहे. परंतु, हे काम आपण करणार नाही. वसुलीचे काम देण्यात यावे, अशा शब्दात त्यांनी झोन अधिकाऱ्यांकडे डिमांड केली. ते ऐकूण झोन अधिकारी देखील आवक झाले. एवढेच नव्हे तर काहींनी तर थेट राजकीय नेत्यांकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्या मनाप्रमाणे काम मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केल्याची देखील चर्चा आहे.
वसुलीचेच काम कशासाठी
कनिष्ठ लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांनाही वसुलीचे काम देण्यापूर्वी त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचे ज्ञान तपासले जाते. त्यासोबतच उच्चशिक्षित असेल तरच विचार केला जातो. परंतु, शासकीय कामकाजाचे कुठलेच अनुभव नसताना अन् तेही चतुर्थश्रेणीमध्ये नियुक्ती असतानाही वसुलीचेच काम कशासाठी हवे.