

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मनपाच्या घरकुल वाटपासाठीही आता म्हाडाप्रमाणे लॉटरी पद्धत राबविली जाणार आहे. पाच ठिकाणी घरकुलची ११ हजार घरे बांधली जाणार असून, यासाठी ४० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. या घरकुलांसाठी लाभार्थीची निवड लॉटरी पद्धती केली जाणार आहे. यासाठी मंगळवारी (दि. २३) मनपा प्रशासकांसमोर विविध एजन्सींकडून सादरीकरण करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरातील हसूल, सुंदरवाडी, पडेगाव, तीसगाव (२ ठिकाणी) या पाच ठिकाणी पालिकेकडून घरकुल योजनेअंतर्गत एकूण ११ हजार २११ घरांचे बांधकाम केले जाणार आहे. यासाठी मनपाकडे सुमारे ४० हजारा-पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. घरांच्या बांधकामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आले आहे. या कंत्राटदारांना बांधकाम परवानगी देण्यात असून, काही भागात घरांच्या बांधकामाला गती प्राप्त झाली आहे. घरकुलासाठी अर्जदारांनी केलेल्या अर्जाची छाननी केली जाणार आहे. तसेच लाभार्थीची निवड करण्यासाठी म्हाडाप्रमाणे लॉटरी काढण्यात येणार आहे. लॉटरी पद्धतीसाठी एजन्सीची नियुक्ती होणार असून, त्याकरिता इच्छुक एजन्सींधारकांनी मंगळवारी मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासमोर सादरीकरण केले. लाभार्थीची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी लॉटरी पद्धत योग्य असल्याचे प्रशासकांनी नमूद केले. घरकूलाचे वाटप आरक्षणाप्रमाणे केले जाणार असून, प्रकल्प बाधितांचाही त्यात समावेश केला जाणार आहे.
बेघर मालमत्ताधारकांना मोफत घरे
पालिकेने रस्ता रुंदीकरणाची मोहीम राबविली. या मोहिमेत रस्त्यात बाधित ठरणारे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे हटविण्यात आली असून, जे बेघर झाले त्याचे सर्वेक्षण करण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. नारेगाव, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा रोड, जालना रोड, बीड बायपास रोडवरील बेघर झालेल्या मालमत्ताधारकांची यादी तयार केली जात आहे. या बेघर मालमत्ताधारकांना पीएमवाय घरकुल योजनेतून मोफत घरे दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
2 ऑक्टोबरपासून गो लाईव्हव्दारे पसंती क्रमांक
घरकुल योजनेसाठी २०२२-२३ पासून नोंदणी केलेल्या लाभार्थीचे पडेगाव, सुंदरवाडी, तीसगाव-२ आणि हर्मूल प्रकल्पासाठी पसंती क्रमांक देणे आणि ऑनलाईन फार्म भरण्यासाठी २ ऑक्टोबरपासून गो लाईव्ह मोहीम प्रॉबिटी एजन्सीमार्फत राबवण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत.