

Ladki Bahin beneficiaries
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या घटलेली नसून प्रत्यक्षात आजही २ कोटी ३० लाखांहून अधिक महिलांना या योजनेच्या लाभ मिळत असल्याचे गुरुवारी (दि. १८) महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यावेळी त्यांनी शहरातील गाजलेल्या विद्यादिप बालगृह प्रकरणावर भाष्य करताना स्पष्ट केले की, मुली सुखरूप राहणे व त्यांना दर्जेदार सुविधा मिळणे ही प्रशासनाची प्रमुख जबाबदारी आहे. काहीवेळा पालक आणि प्रशासन या दोन्ही पातळीवर चुका होतात, मात्र मुलींचे हित सर्वतोपरी असले पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
शहरातील विद्यादिप बालगृहात मुलींचा छळ करण्यात आल्याचे प्रकरण राज्यभरात चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता शहरातील सावली व भगवान बाबा बालिका आश्रमाला भेट देवून तिथल्या मुलींची विचारपूस करण्यासाठी मंत्री अदिती तटकरे या शहरात आल्या आहेत. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होते.
त्या पुढे म्हणाल्या की, लाडकी बहिण योजनेबाबत सध्या सोशल मीडियावर फेक आकडेवारी फिरत आहे. कुठल्यातरी ‘राम पोर्टल’ने फेक बातमी प्रसारित केली असून २ कोटी ६३ लाख हा आकडा नोंदणीचा आहे, तो लाभार्थ्यांचा नाही. प्रत्यक्षात आजही २ कोटी ३० लाखांहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थ्या आहेत. त्यांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. या योजनेचे निकष पूर्वीचेच आहेत. लाभार्थ्यांची पडताळणी ही सतत सुरू असते. विविध विभागांकडून मिळालेला डेटाची आम्ही पळताळणी करत आहोत. पुढील काही दिवसांत सर्व जिल्ह्यांचा ताळमेळ झाल्यानंतर पात्र महिलांना नियमित लाभ मिळत राहील, असे त्यांनी सांगितले.
मराठवाड्यातील लाभार्थ्यांविषयी बोलताना तटकरे म्हणाल्या, जे अपात्र ठरले आहेत त्यांना हे आधीपासूनच ठाऊक होते. मात्र पात्र महिलांवर अन्याय होणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे, असे सांगत मंत्री तटकरे यांनी अफवांना पूर्णविराम देत महिलांना दिलासा दिला. पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याविना मिळत राहील, असा ठोस विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.