

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचऱ्याचे संकलन आणि वाहतूक करण्यासाठी महापालिकेने गुजरात येथील वेस्टर्न इमेजनरी या कंपनीला कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यानुसार कंपनीने शहरातील प्रत्येक वसाहतीचा अभ्यास करून घंटागाडीचे थांबे निश्चित करण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. तर १ फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कचरा संकलनाच्या कामाला सुरुवात करणार आहे.
महापालिका मागील दहा वर्षांपासून खासगी एजन्सीकडून शहरात कचरा संकलन आणि वहतुकीचे काम करून घेत आहे. या कामासाठी अगोदर हैदराबादेतील रॅम्की कंपनीची नियुक्ती केली होती. त्यानंतर या कामासाठी सध्या बेंगरुळू येथील पी. गोपीनाथ रेड्डीची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीसोबत महापालिकेने ७ वर्षांसाठी करार केला होता. ही मुदत ३१ जानेवारी २०२६ रोजी संपणार आहे.
त्यामुळे महापालिका प्रशासन या कंपनीच्या कामावर समाधानी नसल्याने नव्या कंपनीच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या निविदा प्रक्रियेत अहमदाबाद येथील वेस्टर्न इमेजनरी या कंपनीची निवड करण्यात आली. आता या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.
याबाबत प्रशासक जी. श्रीकांत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, कचरा संकलनाचे काम करणाऱ्या नवीन कंपनीला कार्यारंभ आदेश दिला आहे. कंपनीने शहरात सर्वेक्षण सुरू केले आहे. सर्वेक्षणासाठी कंपनीने शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कंपनीला शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तीन शिफ्टमध्ये या कंपनीचे काम चालेल. रेड्डी कंपनीला कचऱ्याच्या वजनावर बिल देण्यात येत होते. या कंपनीला एका शिफ्टमध्ये किती फेऱ्या केल्या यावर बिल दिले जाणार आहे. रेड्डी कंपनीच्या तीनशे घंटागाड्याद्वारे कचरा संकलन करीत आहेत. तर वेस्टर्न इमेजनरी कंपनी सुरुवातीला ३८० गाड्यांद्वारे कचरा संकलनाच्या कामाला सुरुवात करणार आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या बंदिस्त स्वरूपाच्या असणार आहेत.
दररोज १२०० किलोचे टार्गेट
रेड्डी कंपनीच्या घंटा गाडीतून सध्या दररोज ८०० किलो कचऱ्याची वाहतूक होत आहे. परंतु वेस्टर्न इमेजनरी कंपनीच्या गाडीतून १२०० किलो कचऱ्याची वाहतूक करण्यात येणार आहे.
कचरा वर्गीकृत नसल्यास दंड
कंपनीने वर्गीकृत केलेला कचराच संकलित करणे अपेक्षित आहे. जर ९५ टक्के कचरा वर्गीकृत नसेल तर वेस्टर्न इमेजनरी कंपनीला तीन टक्के दंड ठोठावला जाणार आहे.