Sambhajinagar Robbery | बँक कर्मचाऱ्याला लुटणारी टोळी जेरबंद; पाच लाखांच्या रोकड लुटीचा गंगापूर पोलिसांकडून छडा

निफाडमधील दोघांना अटक; न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी
Gangapur Bank Employee Robbery
Gangapur Bank Employee RobberyPudhari
Published on: 
Updated on: 

Gangapur Bank Employee Robbery

गंगापूर : भरदिवसा बँक कर्मचाऱ्याला लक्ष्य करून पाच लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा गंगापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास राठोड आणि रमेश जारवाल यांच्या सतर्कतेमुळे या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन कायगाव शाखेत कार्यरत असलेले विठ्ठल जगन्नाथ चव्हाण (वय ५०, रा. छत्रपती संभाजीनगर) हे २२ जून २०२६ रोजी सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून बँकेकडे जात होते. त्यांची दुचाकी गणेशवाडी गावाजवळील डीपी परिसरात आली असता, अज्ञात दुचाकीस्वारांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांच्याकडील पाच लाख रुपये असलेली रोकड पिशवी हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

Gangapur Bank Employee Robbery
Sambhajinagar Crime News : राहुल चाबुकस्वार टोळीची दहशत कायम; प्लॉटसाठी १५ लाखांची मागणी

या घटनेनंतर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ अन्वये गुन्हा क्रमांक ३३१/२०२६ दाखल करण्यात आला होता. भरदिवसा घडलेल्या या लुटीमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास राठोड आणि रमेश जारवाल यांना गोपनीय खबऱ्यामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सायखेडा येथे सापळा रचला. या कारवाईत सागर सोमनाथ अहिरे (वय २४, रा. जळगावफाटा, निफाड) याला विनाक्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले.

Gangapur Bank Employee Robbery
Chhatrapati Sambhajinagar Crime News: सिमेंटच्या गट्टूने डोके ठेचून कामगाराचा खून; रांजणगाव फाटा येथील घटना

पोलिसांनी केलेल्या चौकशीत सागर याने साथीदार सिद्धार्थ मनोहर साळवे (वय २८, रा. सुंदरपूर, ता. निफाड) आणि अन्य साथीदारांच्या मदतीने दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करून पाच लाखांची रोकड लुटल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून गंगापूर येथे आणले.

दोन्ही आरोपींना गंगापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या टोळीतील इतर फरार साथीदारांचा शोध घेणे तसेच लुटलेली पाच लाख रुपयांची रोकड हस्तगत करणे, यासाठी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाय. एन. पठाण पुढील तपास करीत आहेत.

या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास राठोड आणि रमेश जारवाल यांचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.