

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रभागनिहाय तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्या वादात सापडल्या आहेत. प्रत्येक प्रभागातील सुमारे दीड ते साडेतीन हजार नावांची पळवापळवी करून हेराफेरी केल्याने शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मंगळवारी (दि. २५) ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने महापालिकेत धडक निवडणूक विभागाच्या अधिकार्यांना देत धारेवर धरले. तसेच लाखो मतदारांना मतदानापासून वंचित ठेवायचे का, असा जाब विचारला. ठाकरे गटानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएमही महापालिकेत धडकणार आहे.
महापालिकेच्या अगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादीचा आधार घेत प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार केल्या. या प्रारूप याद्या २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होताच त्यातील नावांची हेराफेरी पाहून नागरिकांसह आता इच्छुकही चक्रावून गेले आहेत.
दरम्यान, मंगळवारी शिवसेना ठाकरे गटाचे शिष्टमंडळ शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात महापालिकेत दाखल झाले. त्यांनी मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त तथा निवडणूक विभागप्रमुख कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. त्याठिकाणी निवडणूक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे हे उपस्थित होते. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रारूप मतदार याद्यांमधील घोळाबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरले. एका मतदार यादीमधील एका कुटुंबातील मतदार वेगवेगळ्या प्रभागामध्ये टाकले अन् आता आक्षेपासाठी सात दिवसच दिले. लाखो मतदार कसे आक्षेप दाखल करतील, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी भाविसे चिटणीस प्रभाकर मते पाटील, माजी नगरसेवक सीताराम सुरे, बन्सी जाधव, लक्ष्मीनारायण बाखरिया, राजू इंगळे, सचिन खैरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूकच कशाला घेताय - एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागांमध्ये टाकण्यात येत आहेत. याद्यातील हा घोळ सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरूनच प्रशासनाने केला आहे. त्यामुळे असा घोळ करण्याऐवजी निवडणुकाच घेऊ नका.
ख्वाजा शरफोद्दीन, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
असेही घेता येईल आक्षेप
मतदार याद्यात ज्या मतदाराचे नाव एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेले. त्या संबंधित मतदाराने रितसर फॉर्म भरुन त्याला स्वतःच्या आधार कार्डची आणि रहीवासी पूराव्याची झेरॉक्स जोडून नातेवाईक अथवा इतर कोणामार्फतही महापालिका निवडणूक विभागाकडे सादर करु शकतात. त्यासाठी वैयक्तीकच यावे, अशी सक्ती नसल्याचेही महापालिका निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
मुस्लिम प्रभाग टार्गेट - शहरातील तिन्ही महापालिका प्रशासन आणि मतदारसंघांतील आमदार यांनी एकत्रित येत या मतदार याद्या तयार केल्या आहेत. ज्यामुळे हिंदूबहुल भागात मुस्लिम मतदार काढण्यात आला आहे. त्यासोबतच दलित मतदारांनाही इतरत्र टाकले आहेत. याविरोधात एमआयएम प्रशासकांना जाब विचारणार आहे.
नासेर सिद्दीकी, माजी नगरसेवक
अधिकाऱ्यांचा मनमानीपणाच महापालिका प्रशासनावर - कोणाचेच वचक राहिलेला नाही. कायद्याकडे दुर्लक्ष करीत मनमानीपणे मतदार याद्या तयार केल्या. त्यामुळे आता हजारो मतदारांना मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आक्षेप दाखल करण्यासाठी मुतदवाढ आणि मतदार याद्यात सुधारणा करा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने प्रशासकांना निवेदन देणार आहोत.
शेख युसूफ, शहराध्यक्ष, काँग्रेस
मनसेही जाब विचारणार - मतदार यादीतील घोळ मनसेनेच समोर 66 आणला आहे. त्याविरोधात आमचा लढा सुरूच आहे. पुराव्यानिशी निवडणूक आयोगाची भेट घेऊ आणि महापालिकेलाही मतदार यादीतील घोळबाबत जाब विचारला जाईल.
सुमित खांबेकर, जिल्हाध्यक्ष, मनसे.
आक्षेपांसाठी मुदतवाढ मागणार -
मतदार याद्यांवर आपेक्ष दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे मुदत वाढवून मिळावी, यासाठी पत्र व्यवहार करणार आहोत. हरकती प्राप्त होताच त्याची स्थळपाहणी करून मतदारांची दुसऱ्या प्रभागात गेलेली मतदार पहिल्या प्रभागात आणले जातील, असे आश्वासन दिले.