

Chhatrapati Sambhajinagar former minister death
गंगापूर: माजी मंत्री अशोकराव राजाराम पाटील डोणगांवकर यांचे छत्रपती संभाजीनगर येथे प्रदीर्घ आजाराने आज (दि.५) सकाळी ११.५७ वाजता निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि.६) सकाळी ११.०० वाजता मुळगांव डोणगाव, (ता. गंगापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या प्रश्चात पत्नी कुसुमताई, भाऊ जिल्हा मजुर फेडरेशनचे चेअरमन रमेश पाटील डोणगांवकर, मुलगा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील डोणगांवकर, मुलगी आमदार मोनिका राजीव राजळे, मुलगा राहुल डोणगांवकर, मुलगी- वैशालीताई सावंत व नातवंडे असा परिवार आहे.
अशोक पाटील डोणगांवकर यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९४३ रोजी झाला. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत झाले. सन १९७७ मध्ये त्यांनी डोणगांव ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या पॅनेलने विजय मिळवला . सन १९७७ ते १९८० या कालावधीत सरपंच पद भुषविले. त्याच दरम्यान ते वाळूज जिल्हा परिषद सर्कल मधून सदस्य म्हणून निवडून आले. जिल्हा परिषद सदस्य असतानाच सन १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची विमानतळावर भेट घेऊन गंगापूर-खुलताबाद मतदार संघाचे काँग्रेसची उमेदवारी मिळवून ते आमदार म्हणून निवडून आले. सन १९८० ते १९८५ या त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी गंगापूर-खुलताबाद तालुक्यात विविध विकास कामे त्यामध्ये एस.टी.डेपो, आय.टी.आय., तहसिल इमारतीसह तालुक्याला जोडणारे प्रमुख रस्त्यांसह विविध कामांसाठी विकास निधी खेचून आणून ते मार्गी लावले.
दरम्यान सन १९८३ ते १९८६ या कार्यकाळात त्यांनी मोपेक चे उपाध्यक्ष पदही भुषविले. भुविकास बँकेचे संचालक म्हणुनही त्यांनी काम पाहिले. सन १९९५ मध्ये अतिशय प्रतिकुल प्ररिस्थितीत त्यांनी अपक्ष म्हणुन निवडुन येऊन तत्कालीन भाजपा सेनेच्या युतीला सरकार स्थापन करणेसाठी कमी पडत असलेली आमदारांची संख्या जुळवण्यासाठी महाराष्ट्रातील अपक्ष म्हणुन निवडुन आलेले आमदारांची मोट बांधुन त्यांचे नेतृत्व करीत युती सरकार बनविण्यात महत्वाची भुमिका बजावली. या युतीच्या मंत्रीमंडळात त्यांना सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणुन मंत्रीपदाची संधी मिळाली. या मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी गंगापुर -खुलताबाद तालुक्याच्या विकासासाठी नांदुर-मधमेश्वर कालव्यासाठी मोठा निधी उपलब्ध करुन हा कालवा चालू केला. तसेच गंगापूर ते भेंडाळा रस्ता, नागपूर मुंबई महामार्ग, घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना व इतर मोठी कामे मार्गी लावले.
गंगापूर व खुलताबाद तालुक्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची गैरसोय दुर होण्यासाठी अशोक पाटील डोणगांवकर यांनी सन १९८२ साली मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून सन १९८३ साली लासुर स्टेशन येथे मुलींसाठी पहिल्या कन्या विद्याल्याची सुरुवात केली. आज घडीला संस्थेच्या दहा पेक्षा जास्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालये दोन्ही तालुक्यात कार्यरत आहेत.
तसेच सन १९९० साली भगीरथी शिक्षण संस्थेची स्थापना देखिल त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येऊन दोन्ही तालुक्यातील मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणाचे दारे उघडण्यात आली.
१. नाव : अशोकराव पाटील डोणगांवकर
२. जन्म तारीख : ११/११/१९४३
३. शिक्षण : बी.ए.- सरस्वती भुवन महाविद्यालय, छ. संभाजीनगर
४. पत्ता १) ३७, विरंगुळा, सहकारनगर, औरंगाबाद-४३१००५ (महाराष्ट्र)
२) मु.पो. डोणगांव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद.
५. विधानसभा सदस्य (आमदार)
: सन १९८० ते १९८५, १९९५ ते १९९९
६. राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) : सन १९९५ ते १९९७
७. अध्यक्ष १) डोणगांव विकास मंडळ १९७७-८०
२) भगिरथी शिक्षण संस्था, डोणगांव, ता. गंगापुर.
३) मुक्तेश्वर शिक्षण संस्था, गंगापुर, ता. गंगापुर.
८ उपाध्यक्ष : मोपेक सन १९८३-१९८६
९. सरपंच : ग्रामपंचायत, डोणगांव १९७७-८०
१०. जिल्हा परिषद सदस्य : सन १९७७-८०, १९९३-९५
१०. संचालक : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, औरंगाबाद भुविकास बँक, औरंगाबाद
११. सदस्य : रोजगार हमी योजना (महाराष्ट्र राज्य) सन २००० ते २००४