

Chhatrapati Sambhajinagar encroachment The current situation of 300 families has been destroyed for development.
अमित मोरे
छत्रपती संभाजीनगर शहराच्या भविष्याचा हवाला देत विकास आराखड्यानुसार महापालिकेने जालना रोड, पैठण रोड, बीड बायपास रोड, जुना मुंबई हायवे आणि जळगाव रोडवर रुंदीकरणाची मोहीम राबविली. यात शेकडो दुकाने, घरे आणि हॉटेल्स जमीनदोस्त केले. परंतु प्रशासनाच्या या बेधडक कारवाईने सुमारे ३०० हून अधिक कुटुंबांचे वर्तमान उद्ध्वस्त झाले असून, महिना उटूनही यातील अनेकांना दुकानही थाटता आले नाही. त्यामुळे या व्यावसायिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. किमान जागेचा मोबदला मिळेल, अशी आशा बाधितांना होती. परंतु प्रशासनाने येथेही चालाखी दाखवत ही भूसंपादनाची कारवाई नव्हे तर बेकायदा बांधकामाविर-ोधातील मोहीम असल्याचे सांगून हात वर केले.
महापालिकेची स्थापना होण्याच्या अगोद-रपासून हसूल, पडेगाव, मिटमिटा, चिकलठाणा हे गाव अस्तित्वात आहेत. त्यामुळे या वसाहतींना गावठाण, असे संबोधण्यात आले आहे. शासनाच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये गावठाणातील बांधकामाबाबत स्पष्टपणे सूचना केल्या आहेत. त्यानुसार या भागातील मालमत्ता पाडण्यापूर्वी महापालिकेने रीतसर भूसंपादन प्रक्रिया राबविणे आवश्यक होते. मात्र तसे न करताच महापालिकेने आयुक्तांच्या विशेष अधिकाराचा वापर करून पाडापाडी केली. रस्ते रुंद झाल्यास भविष्यात शहराच्या विकासाला चालना मिळेल, असे सांगण्यात येत आहे. परंतु भविष्याचा विचार करणाऱ्या प्रशासनाने शेडको कुटुंबांच्या वर्तमानावरच हल्ला चढवला आहे.
चिकलठाण्याच्या पाडापाडीमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंची सुमारे दीडशे ते पावणेदोनशेहून अधिक दुकाने, हॉटेल बंद पाडले. अनेकांनी पडलेल्या दुकानांचे स्थलांतराचे फलक लावले असून, त्यावर पत्ता हा राहत्या घराचा दिला आहे. या कारवाईला आता एक महिना होत आला असतानाही यातील सुमारे ९० टक्के व्यावसायिकांना साधे दुकानही भाडेतत्त्वावर घेणे शक्य झाले नाही. बहुतांश व्यावसायिकांना जेमतेम उत्पन्न मिळत होते. काहींचे किराणा दुकान तर काहींचे कापड विक्रीचे, ज्वेलर्स, ऑटोमोबाईल्स, चहा, मिठाईचे दुकान आणि काहींचे भांडे, काच, शटर विक्रीचे दुकान होते. वर्षानुवर्षासून ते येथे व्यवसाय करीत होते. मात्र महापालिकेच्या कारवाईने त्यांचे होत्याचे नव्हते झाले आहे.
महापालिकेने रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारी बांधकामे पाडली. परंतु जेव्हा नागरिकांनी खुल्या जागेच्या मोबदल्यासाठी महापालिकेकडे तगादा लावला, तेव्हा प्रशासने ही मोहीम रस्ता रुंदीकरणासाठी नसून बेकायदा बांधकामाविरोधात होती. तसेच रस्ता रुंदीकरणाची मोहीम जेव्हा राबविण्यात येईल. तेव्हा रीतसर भूसंपादन प्रक्रिया राबवू, असे खुलासा केला जात आहे. प्रशासकांच्या या बनवाबनवीमुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. भूसंपादन करायचेच नव्हते तर आमची दुकाने पाडली कशासाठी, असा सवाल येथील ७० हून अधिक व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
वडील बाजारात जाऊन भांडी विक्रीचा व्यवसाय करीत होते. थोडे पैसे जमा झाल्याने त्यांनी सुमारे १५ ते १८ वर्षांपूर्वी चिकलठाण्यात दुकान थाटली होती. गावातील अनेक जण खरेदीसाठी येत. मात्र महापालिकेने दुकान पाडल्याने आता नवीन दुकान शोधण्याची वेळ आली आहे. अद्याप दुकान मिळाले नसल्याने घरातच दुकान सुरू केले.