

छत्रपती संभाजीनगर : अशोक विजयादशमी आणि ७० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी (दि. २०) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठालगतच्या बुद्धलेणी धम्मभूमीवर हजारो भीमसैनिकांनी गर्दी केली होती. निळे व पंचशील ध्वज, पांढऱ्या शुभ्र वेशभूषेतील अनुयायी, बुद्धं शरणं गच्छामीचा गजर आणि तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर धम्ममय झाला होता.
सकाळपासूनच विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपासून बुद्धलेणीपर्यंतच्या मार्गावर अनुयायांची वर्दळ सुरू होती. बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या प्रज्ञा प्रसार धम्म संस्कार केंद्राच्या महाविहारात बुद्धवंदनेसाठी उपासक-उपासिकांनी गर्दी केली. भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात सायंकाळनंतर अनुयायांची मोठी गर्दी उसळली.
महाविहारात सकाळी सहापासून सामूहिक ध्यान, बुद्धवंदना, परित्राण पाठ आणि धम्मध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. त्यानंतर भिक्खू संघाचे स्वागत, धम्मदेसना आणि प्रमुख भिक्खू संघाचे मार्गदर्शन झाले. गायक प्रकाशदीप वानखेडे यांच्या बुद्ध-भीमगीतांच्या कार्यक्रमाने वातावरणात उत्साह निर्माण केला. बुद्धलेणी ते विद्यापीठ या मुख्य रस्त्याच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम झाला.
पुस्तके, बुद्धमूर्तीच्या खरेदीला प्रतिसाद
धम्मभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा खाद्यपदार्थ, बुद्धमूर्ती, डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमा आणि वैचारिक पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले होते. अनुयायांनी खरेदीसाठी गर्दी केली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संस्थांनी अन्नदान, खीरदान व पाण्याचे वाटप केले. आयटीआय कर्मचारी संघटनेने दहा हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. अमृता ब्लड बँकेसह अन्य संस्थांनी रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिरांचे आयोजन केले. विविध राजकीय नेते व लोकप्रतिनिधींनीही धम्मभूमीला भेट देऊन अनुयायांना शुभेच्छा दिल्या.