

छत्रपती संभाजीनगर : शहरात महापालिकेची अतिक्रमण विरोधात धडक मोहीम सुरूच आहे. बेकायदा प्लॉटिंग बाजार उठविल्यानंतर आता पुन्हा शहरातील अतिक्रमणांकडे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी मोर्चा वळविला आहे. यात शनिवारी (दि. २६) जळगाव रस्त्यावरील प्यासा वाईन शॉपखाली साईड मार्जिन आणि अंडरग्राऊंडमधील अनधिकृत बिअर बारवर जेसीबी फिरविला. त्यासोबतच पार्किंगमधील दुकाने जमीनदोस्त केली.
महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशाने शहरात अतिक्रमण विभागाची धडक मोहीम सुरूच आहे. गेली दोन आठवडे पथकाने शहरालगतच्या सुमारे २० हून अधिक गटांमध्ये असलेली बेकायदा प्लॉटिंगची दुकानदारी बंद पाडली. येथील सुमारे १ हजार अनधिकृत प्लॉटचे रेखांकन निष्कासित करून तेथील रस्ते उखडून टाकले. तसेच नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांविरोधात गुन्हे दाखल केले.
या धडक मोहिमेनंतर आता पथकाने आपला मोर्चा हा शहरातील अतिक्रमणांकडे वळविला आहे. अपार्टमेंट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मोठी बांधकामांच्या बाजूला सोडण्यात आलेल्या मोकळ्या साईड मार्जिनमध्ये बेकायदेशीररीत्या बांधकाम करून व्यवसाय थाटणारे व घरे बांधणाऱ्यांविरोधात पथकाने कारवाई सुरू केली आहे.
यात शनिवारी पथकाने हडकोतील शरद टी पाइंट येथील प्यासा वाईन शॉपच्या खाली असलेल्या अंडरग्राऊंडमध्ये आणि साईट मार्जिनमध्ये अनेक वर्षांपासून एकाने बेकायदेशिररीत्या बिअरबारच थाटला होता. याविरोधात अनेकांनी तक्रारी केल्या. परंतु, अद्याप काहीच कारवाई झाली नव्हती. वर वाईनशॉपमधून मद्य घेऊन खाली अनधिकृत बारमध्ये ते सेवन करण्याचा प्रकार सुरू होता.
याविरोधात शनिवारी सनियंत्रण अधिकारी संतोष वाहूळे यांच्या पथकाने आयुक्तांच्या आदेशाने धडक कारवाई केली. या अनधिकृत बारवर जेसीबी फिरवून अतिक्रमणमुक्त केले. त्यानंतर परिसरातील इतर हॉटेल्सच्या साईट मार्जिन व पार्किंगच्या जागेतील सुमारे १५ दुकाने जमीनदोस्त केले. सहायक आयुक्त संजय सुरडकर इमारत निरीक्षक रवींद्र देसाई आणि नागरी मित्र पथकाच्या जवानांनी चोख बंदोबस्तात ही कारवाड केली.
शहरात हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट आणि अपार्टमेंट हॉस्पिटलच्या फ्रंट व साईट मार्जिनमध्ये मोठ्याप्रमाणात बांधकामे झाली आहेत. अश मालमत्तांच्या तपासणी विशेष पथक स्थापन केले आहे. त्यानुसार कारवाई केली जात असल्याचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहूळे यांनी सांगितले-
कारवाई रोखण्यासाठी दबाव
प्यासा वाईन शॉप खालचा अनधिकृत बिअर बार तोडण्यास सुरुवात होताच अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोहीम थांबविण्यासाठी पथकाला फोन करून दबाव टाकला. परंतु, आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई सुरूच राहिली. पथकाने विरोध न जुमानता कारवाई केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून महिला, तरुणींसाठी असुरक्षित असलेला हा रस्ता आता सुरक्षित झाला आहे.