

छत्रपती संभाजीनगर : कोणताही ओटीपी शेअर न करता, अज्ञात लिंक किंवा एपीके फाईल डाउनलोड न करता आणि बँक खात्याची कोणतीही माहिती न देता एका ४८ वर्षीय महिलेच्या बँक खात्यातून तब्बल १७ लाख ८२ हजार २६८ रुपये उडवल्याचा प्रकार समोर आला आहे.
सायबर भामट्यांनी एकाच दिवसात ७ आयएमपीएस ट्रान्झॅक्शनद्वारे जवळपास २८ लाख रुपये वळवले होते. त्यातील काही रक्कम परत मिळवण्यात यश आले असले तरी, उर्वरित पैशांसाठी या महिलेने आता जवाहर नगर पोलिसांत धाव घेतली आहे. त्यावरून अज्ञाताविरुद्ध सोमवारी (दि.१७) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारिका अविनाश तोलवानी (४८, रा. सिंधी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्या शिवणकाम करतात. त्यांच्या खात्यात तब्बल २३ लाख ३० हजार रुपये शिल्लक होते. २४ डिसेंबर २०२५ रोजी फोनपे वरून बँकेचा बॅलन्स चेक केला, तेव्हा खात्यात केवळ २९ हजार रुपये शिल्लक असल्याचे दिसले.
खात्यातील लाखो रुपये गायब झाल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या खात्यातून एकूण ७ 'आयएमपीएस' ट्रान्झॅक्शनद्वारे तब्बल २७ लाख ९७ हजार ०१० रुपये काढण्यात आल्याचे समोर आले.
१० लाखांची रक्कम मिळाली परत
यापैकी ४,९८,००० रुपयांची एक रक्कम त्याच दिवशी बँकेकडून त्यांच्या खात्यात परत जमा झाली. त्यानंतर तोलवानी कुटुंबाने तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर सायबर सेलने वेगाने पावले उचलत ५ लाख १६ हजार ७४२ रुपये 'होल्ड' केले, जे नंतर कोर्टाच्या क्लेमद्वारे तोलवानी यांना परत मिळाले.
कोणतीही माहिती शेअर न करता फसवणूक
विशेष म्हणजे, तोलवानी यांनी कोणत्याही प्रकारची एपीके फाईल मोबाईलवर डाउनलोड केली नव्हती, कोणालाही ओटीपी शेअर केला नव्हता किंवा बँक खात्याची माहिती दिलेली नव्हती. असे असूनही त्यांची १७ लाख ८२ हजार २६८ रुपयांची फसवणूक झाली आहे. या अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध कारवाई करून आपली कष्टाची रक्कम परत मिळावी, अशी विनंती सारिका तोलवानी यांनी तक्रारीत केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन कुंभार करत आहेत.