

छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झालेल्या पीडित महिलेच्या मोपेडला कार आडवी लावून अपघात केला. पीडितेसोबत संरक्षणासाठी असलेली महिला अंमलदारही खाली पडून जखमी झाली. त्यानंतर केसची तारीख असल्याने कोर्टात गेलेल्या पीडितेला एका वकिलाने आज तुमचा अपघात केला, तू तुझी केस मागे घे, नाही तर तुला जिवे मारू, अशी धमकी दिली. ही घटना १३ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास जिल्हा न्यायालयात घडली.
ॲड. संतोष सरताळे आणि कारचालक (एमएच-२०-जीके-८९८३) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी २७ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ती मूळ जळगाव जिल्ह्यातील असून, तिची सेशन कोर्टात केस सुरू असल्याने तिला संरक्षण म्हणून पोलिस मुख्यालयातील एक महिला अंमलदार सोबत दिलेली आहे. १३ ऑगस्ट रोजी कोर्टात केसची तारीख असल्याने तक्रारदार महिला व महिला अंमलदार या मोपेडवरून सेशन कोर्टाकडे निघाल्या होत्या. दुपारी एकच्या सुमारास कोर्टाजवळ कारचालकाने सुसाट येऊन मोपेडच्या पुढे कार अचानक घेऊन ब्रेक लावले. त्यामुळे मोपेडस्वार दोघीजणी धडकून खाली पडल्या. कार चालकाला जाब विचारताच त्याने काय करायचे ते करा, असे म्हणत धमकावून निघून गेला. त्यानंतर पीडित महिला व पोलिस अंमलदार या दोघी सेशन कोर्टात आल्या. तिथे आरोपी ॲड. संतोष सरताळे याने आज तुमचा अपघात केला. तू तुझी केस मागे घे, अन्यथा जिवे मारू, अशी धमकी दिली. त्यावरून पीडितेने वेदांतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने सोमवारी (दि. २५) गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार वर्षा मुंढे करत आहेत.