

छत्रपती संभाजीनगर : शहरातील जुन्या, नव्या आणि नो नेटवर्क भागांना ऑक्टोबर महिन्यानंतरच मुबलक पाणीपुरवठा सुरू होणार आहे. सध्या ९०० मिमीच्या जलवाहिनीमुळे केवळ पाण्याचा खंड काळ एक दिवसाने कमी होणार आहे. परंतु ऑक्टोबरनंतर शहराला १२००, ९०० आणि ७०० जलवाहिनीतून १७१ आणि २५०० मिमीच्या जलवाहिनीतून २०० एमएलडी असे एकूण ३७० एमएलडी पाणीपुरवठा होईल, असा दावा मंगळवारी (दि.१९) जायकवाडीतील कामाच्या पाहणी दौऱ्यावेळी प्रशासक जी. श्रीकांत यांनी केला.
यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अमगुथू रंगा नायक, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, मुख्य अभियंता मनीषा पलांडे, अधीक्षक अभियंता अजय सिंग, दीपक कोळी, कार्यकारी अभियंता दीपेंद्र कोराटे, मनपाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांच्यासह जीव्हीपीरचे प्रमुख शिवा रेड्डी यांची उपस्थिती होती. पाणीप-रवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करून संभाजीनगरकरांना येत्या ऑक्टोबरनंतर दररोज २०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ऑक्टोबर २०२५ अखेरची डेडलाईन दिली आहे. ही डेडलाईन पाळण्याच्या दृष्टीने एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदार जीव्हीपीआरच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे धिम्या गतीच्या कामाला आता गती मिळाली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, सध्या ७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून शहराला १३० ते १४० एमएलडी पाणी मिळत आहे, त्यात ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून आता ४१ एमएलडी पाण्याची भर पडल्याने १७१ एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे.
ऑक्टोबरअखेरीस नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. त्यामुळे आणखी २०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे एकूण ३७१ एमएलडी पाणी शहराला मिळणार असल्याने पाण्याचा प्रश्नच मार्गी लागेल, असेही ते म्हणाले.
सध्या १७० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. शहराच्या ६० टक्के भागात सध्या पाचव्या दिवशी पाणी मिळते. उर्वरित २० टक्के भागाला सहाव्या आणि सातव्या, तर उर्वरित २० टक्के भागाला दहाव्या दिवशी पाणी मिळत आहे. हा खंडकाळ आता एक दिवसाने कमी होईल, असे जी. श्रीकांत म्हणाले.
नवीन पाणीपुरवठा योजनेवर १२ ठिकाणी पाईप जोडणीचे काम शिल्लक आहे. या जोडणीसाठी गणेशोत्सवानंतर ३ दिवसांचा शटडाऊन घ्यावा लागणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
शहराला नव्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून वाढीव २६ एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या योजनेचे जलपूजन मंगळवारी (दि.१९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार होते. मात्र मुंबईत मुसळधार पाऊस सुरू झाल्याने ऐन-वेळी जलपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता महापालिका नव्याने वेळ घेऊन जलपूजन करेल, अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी राज्य शासनाने मंजूर केलेली १९२ कोटी रुपयांची जलयोजनेचे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र या योजनेसाठी आवश्यक असलेल्या २६ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राअभावी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून आतापर्यंत २० ते २५ एमएलडी पाणीच शहराला मिळत होते. परंतु नुकतेच हे जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण झाल्याने या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाण्याची चाचणी सुरू करण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याने ९०० च्या जलवाहिनीतून वाढीव पाणी घेतले जात आहे. मंगळवारी (दि.19) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे जलपूजन केले जाणार होते. परंतु मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने हा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन होणार असल्याने महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी दोन दिवसांपासून कार्यक्रमाच्या तयारीत होते. स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. पावसामुळे वॉटरप्रूफ मंडप टाकले होते. मात्र हा लाखोंचा खर्च आता पाण्यात गेला आहे.