

छत्रपती संभाजीनगर : सुमारे १८ लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी पद गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून रिक्त आहे. नियमित अधिकारी मिळावा यासाठी महापालिका प्रशासनाने शासनाकडे सात वेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे निवृत्त अधिकारी अशोक खांडेकर यांच्याकडे कंत्राटी पद्धतीने पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.
खांडेकर यांची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असल्याने शहराच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी त्यांच्याकडे का, असा सवाल नगरसेवकांनी मंगळवारी (दि. २५) सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. नियमित मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त आहे. या पदासाठी विज्ञान शाखेतील पदवीसह अग्निशमन विषयातील अभ्यासक्रम किंवा बी.ई. फायर इंजिनिअरिंग आणि डिव्हिजन फायर ऑफिसर म्हणून अनुभव आवश्यक आहे. मात्र पात्र अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
खांडेकर हेही दोन महिन्यांपूर्वी निवृत्त झाले असून, नवीन अधिकारी मिळेपर्यंत त्यांची कंत्राटी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहराच्या अनिसुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखडे यांच्यासह सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. निवृत्त अधिकाऱ्याला कायम ठेवण्यामागचे कारण काय, असा सवालही करण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी शासनाकडे सात पत्रे पाठविल्याचे सांगितले. खांडेकर यांना अग्निशमन दलातील कामाचा अनुभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयुक्त अमोल येडगे यांनी आवश्यक अनुभवाच्या अटींमुळे पदोन्नतीत अडचणी येत असल्याचे सांगितले. शासनाकडून नियमित अधिकारी मिळताच खांडेकर यांची नियुक्ती संपुष्टात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांकडून अधिकारी देण्याचे आश्वासन
महापौर समीर राजूरकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिकेसाठी कायमस्वरूपी मुख्य अग्निशमन अधिकारी देण्याची मागणी केल्याचे सभागृहात सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अधिकारी देण्याचे आश्वासन दिल्याचे राजूरकर यांनी स्पष्ट केले.