

Charna River Flood
सिल्लोड : सिल्लोड तालुक्यातील आमठाणा मंडळात रविवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे चारणा नदीला प्रचंड पूर आला. या पुराचे पाणी देऊळगाव बाजार, आमठाणा, पेंडगावसह नदीकाठच्या गावांत घुसल्याने संपूर्ण गाव जलमय झाले.
देऊळगाव बाजार येथील नदीकाठच्या एका दुकानात रात्री थांबलेल्या काही नागरिकांना जीव वाचवण्यासाठी संपूर्ण रात्र छतावर काढावी लागली. सोमवारी पहाटे महसूल विभागाच्या मदत पथकाने रिस्क्यू मोहीम राबवून सर्वांना सुखरूप बाहेर काढले. नदीकाठच्या गावांनी सुरक्षिततेसाठी पात्रापासून दूर जाऊन थांबावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि तहसीलदार सतीश सोनी यांनी केले आहे.
दरम्यान, तालुक्यातील केळगाव लघु प्रकल्पासह खेळणा निल्लोड, पेडगाव चारनेर, पेंडगाव चारनेर मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तसेच अजिंठा-अंधारी, हळदा-डकला, रहिमाबाद, उंडणगाव आदी प्रकल्प अर्ध्याहून अधिक भरले असून अद्यापही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.