

Heavy Rain Marathwada latur, sambhajinagar, beed nanded flood
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा
वर्षाच्या सुरुवातीला जेमतेम हजेरी लावणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात जोरदार बरसला. मराठवाड्यात गेल्या चोवीस तासांत पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. यात गुरुवारी (दि.28) 130 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यापैकी नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून, तब्बल 70 मंडळ पाण्याखाली आहेत.
मराठवाड्याच्या जवळपास सर्वच भागांत मान्सूनचा पाऊस बरसत आहे. त्यात गुरुवारी जोरदार पावसाने नांदेड जिल्ह्यात कहर केला. या जिल्ह्यातील 70 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या मंडळांमध्ये 24 तासांतच 150 ते 230 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. गेल्या चोवीस तासांत या रेकॉर्ड ब्रेक पावसाने नांदेडमधील तुप्पा, विष्णुपुरी, कंधार, लोहा व मुदखेड या भागांमध्ये हाहाकार माजवला.
तुप्पा, विष्णुपुरी, कंधार - पेठवडज, बारूळ व लोहा - मलकौली येथे 250 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. कंधार तालुक्यातील कुरुळा, दिग्रस, तसेच उमरी व मुखेड परिसरात 150 ते 230 मिमी पाऊस कोसळला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, वैजापूर व कन्नड तालुक्यांतही मुसळधार पाऊस झाला. यात पैठणमधील लोहरा व गंगापूरमधील शेंदूरवादा येथे 150 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला. तर वैजापूर व कन्नडमधील अनेक मंडळांत शेतामध्ये अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले.
दरम्यान लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उदगीर व चाकूर तालुक्यांत तुफान पाऊस बरसला. चाकूरमधील वडवळ, शेलगाव आणि अहमदपूरमधील अंधोरी, हडोळटी येथे 178 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. तसेच बीड जिल्ह्यात अंबाजोगाई, शिरूर कासार तर हिंगोली व परभणीतील अनेक भागांतही 100 मिमीच्या पुढे पाऊस झाला. नद्या-नाले तुफानी वेगाने वाहत आहे. या ठिकाणची परिस्थिती भीषण असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. या तुंबळ पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकूणच, गेल्या चोवीस तासांतील पाऊस मराठवाड्यासाठी आपत्तीदायक ठरला आहे. यात नांदेड जिल्हा केंद्रबिंदू ठरला असून, विक्रमी पावसाने हाहाकार माजवला आहे.
मागील तीन-चार दिवसांच्या विश्रांतीनंतर अकोल्याच्या म्हातोडी गावात पुन्हा एकदा संततधार पाऊस सुरू झाला आहे. ढगफुटीसद़ृश पावसामुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. गावात सर्वत्र पाणी साचले असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे.
अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अर्थात मध्य प्रदेशातील गावांमध्ये बर्यापैकी पाऊस झाल्याने धरणातील जलसाठा 90 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
नांदेड जिल्हा : कंधार तालुका : कंधार (284.5 मिमी), पेठवडज (275.0), बारुळ (275.0), कुरुळा (229.5), लोहा : मलकौली (284.5), कपाशी (267.7), लोहा (194.5), सोनखेड (194.5),नांदेड तालुका : तुप्पा (267.7), विष्णुपुरी (267.7), वजेगाव (199.7), तरोडा (193.2), मुदखेड तालुका : मुदखेड (237.2), मुगट (165.2), बराड (125.7), धर्माबाद तालुका : धर्माबाद (182.7), सिराजकेड (182.7), कारखेली (140.5), मुखेड तालुका : जांभ (229.5), चंदोळा (162.0), येवती (139.5), उमरी तालुका : सिंधी (170.5), धनोडा (165.5), उमरी (137.7) (याशिवाय 40+ मंडळांत 70 ते 160 मिमी पाऊस) लातूर जिल्हा : चाकूर : शेलगाव, वडवळ (178.0), नालेगाव (138.2), अहमदपूर : अंधोरी, खंडाळी, हडोळटी (152.2), उदगीर : देवर्जन, हेर (176.5), वाधवना (125.7), लातूर : हरंगुळ, कानेरी (119.2), कसारखेडा (114.0), छत्रपती संभाजीनगर जिल्हा (4 मंडळ) : गंगापूर : शेंदूरवादा (184.8), पैठण : लोहगाव (153.0), वैजापूर : गारज (93.5), कन्नड : देवगाव (71.5), बीड जिल्हा (15 मंडळ) : शिरूर कासार : शिरूर (110.2), खळापुरी (97.0), ब्रह्मनाथ येळंब (88.5).अंबाजोगाई : बर्डापूर (94.7), अंबाजोगाई (69.5), बीड : राजुरी, चारहाता (74.7), पेंढगाव (66.0), परभणी : गंगाखेड (77.0 मिमी), हिंगोली : कळमनुरी (डोंगरकडा 88.7, वरंगा 76.7), धाराशिव : वाशी पारगाव. लातूरला यलो अलर्ट : लातूर जिल्ह्यातही दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली आहे. लातूर जिल्ह्यातील जवळपास 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 91.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.
उमरी तालुक्यातील बोळसा रेल्वेस्थानकावरील स्टेशन मास्तर ओमप्रकाश शिवलाल मीना (वय 50) हे आपली ड्यूटी करून नेहमीच्या रस्त्याने दुचाकीवरून उमरीला घराकडे येत होते. मुसळधार पावसाने रस्त्यावरील नाल्यातील त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले. आणि मरण पावले. ही घटना गुरुवारी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. साडे दहा वाजले तरी ते उमरीला का आले नाहीत म्हणून त्याच्या पत्नीने संपर्क केला, परंतु नेटवर्क नसल्याने फोन लागला नाही.
त्यातच पत्नीने बोळसा रेल्वेस्थानकावर फोन करून कर्मचार्यांना साहेब घरी आले नाहीत.ते कोठे गेले आहेत याचा शोध घ्यायला सांगितले. शोध घेतला असता ओमप्रकाश मीना यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला.अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत तेथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच निजामाबाद येथील नातेवाईक उमरीला आले.ते राजस्थान येथील रहिवाशी असल्याने त्यांचा अंत्यविधी राजस्थानातच करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे पोलीस अधिकारी अनंता आघाव यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.पत्नी आणि मुलगी उमरीला असतात. मुलगा शिक्षणासाठी आजी, आजोबाकडे राजस्थानात राहतो.