छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: गतवर्षी तरुणांच्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तो सहा महिने कोमात होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची प्रकृती पूर्वपदावर आली. त्याचवेळी त्याने गतवर्षी त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांना इशारा देण्यासाठी एका मजुराचा अशोक शिनगारे बळी घेतला. धक्कादायक (मयत) म्हणजे, अवघ्या २२ सेकंदांत त्याने मजुरावर चाकूने सपासप २२ जीवघेणे वार करून दहशत निर्माण केली. ८ ऑक्टोबरला पहाटे ५ वाजता नागसेननगरात ही थरारक घटना घडली. या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अशोक दादाराव शिनगारे (४६, रा. नागसेननगर) असे मृत मजुराचे तर निखिल शिंगाडे (रा. नागसेननगर), असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी मृत अशोक शिनगारे यांचा मुलगा आशिष याने फिर्याद दिली. त्यानुसार, त्याचे वडील ८ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले. ते फिरत असताना ओळखीचा निखिल शिंगाडे हा त्रिभुवन चौकातून समोरून येऊन शिनगारे यांच्याशी बोलत होता. यावेळी प्रज्योत शिंगाडे आणि अक्षय गायकवाड हे दोघेही तेथे आले. बोलता बोलता अचानक आरोपी निखिल याने अशोक शिनगारे यांची कॉलर पकडली. त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली.
लगेचच निखिलने त्याच्याकडील चाकूने अशोक शिनगारे यांच्यावर वार केले. त्यांच्या पाठीवर, मानेवर, तोंडावर त्याने सपासप वार केले. शिनगारे खाली कोसळल्यानंतरही निखिल त्यांच्यावर वार करीत होता. अवघ्या २२ सेकंदांत त्याने तब्बल २२ वार करून अशोक यांना जागीच ठार केले. तेथे उभ्या असलेल्या प्रज्योत आणि अक्षयने पळ काढला. तर निखिल मात्र शांततेत निघून गेला.
हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे. आरोपी निघून गेल्यावर काही नागरिकांनी पळत जाऊन शिनगारे यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीय आले तेव्हा अशोक शिनगारे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले होते. कुटुंबीयांनीच डायल ११२ ला कॉल करून माहिती दिली. उस्मानपुरा पोलिस घटनास्थळी धावले. त्यांनी शिनगारे यांना घाटीत नेले.
अशोक शिनगारे यांचा खून करून शांततेत निघून गेलेला आरोपी निखिल शिंगाडे याचा पोलिसांनी शोध घेतला असता तो त्याच परिसरात एका शटरजवळ झोपलेला आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुपारी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक केली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी चौरे करीत आहेत.
गतवर्षी निखिल शिंगाडेबर नागसेननगरात काही तरुणांनी चाकूहल्ला केला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अनेक महिने उपचार सुरू होते. जवळपास सहा महिने तो दवाखान्यातच होता. त्यातीन अनेक दिवस तो कोमात होता. प्रकृती पूर्वपदावर येताच त्याने हल्लेखोरांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी वर्तविला आहे.