

छत्रपती संभाजीनगर : लहान भावाच्या लग्नासाठी मालेगावला गेलेल्या एका कुटुंबाचे बंद घर फोडून चोरट्यांनी ३ तोळे ८ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, २ लाख ९० हजारांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना रविवारी (दि.२३) पहाटे चार वाजेच्या सुमारास इंदिरानगर गल्ली क्र. १ येथे घडली. विशेष म्हणजे, कुटुंबीय पहाटे घरी परतले असता घरात चोरटा हजर होता, मात्र महिलेने आरडाओरड करताच त्याने मागील दाराने धूम ठोकली.
फिर्यादी नसरीन नासेर शेख (४९, रा. इंदिरानगर, गल्ली क्र. १, गारखेडा परिसर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा लहान भाऊ शेख वसीम याचे मालेगाव (जि. नाशिक) येथे लग्न असल्याने, शनिवारी (दि. २२ ऑगस्ट) सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास नसरीन आणि त्यांचा मुलगा नासेर घराला कुलूप लावून लग्नासाठी गेले होते.
लग्नकार्य आटोपून रविवारी (दि. २३ ऑगस्ट) पहाटे ४:१५ वाजेच्या सुमारास ते गावाहून परतले. तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उघडे दिसले. त्यांनी लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत बाजूलाच पाण्याच्या ड्रमवर ठेवलेले होते. नसरीन यांनी घरात प्रवेश करताच त्यांना आतून कोणीतरी पळून जात असल्याचा आवाज आला.
घरात चोर असल्याचे समजताच त्यांनी ‘चोर.. चोर..’ असा आरडाओरड सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून जवळच राहणारे त्यांचे जावई व नातेवाईक धावून आले. मात्र, तोपर्यंत चोरट्याने घराच्या मागील उघड्या दरवाजातून पोबारा केला होता. घरात जाऊन पाहिले असता, समोरील रूममधील लोखंडी कपाट तुटलेले आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
हा ऐवज गेला चोरीला
चोरट्याने प्रत्येकी एक तोळ्याच्या ३ सोन्याच्या पोत, ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी, अर्धा ग्रॅमची अंगठी, १ ग्रॅमची सोन्याची नाकातील मोरणी, चांदीचे लहान बाळाचे कडे, चांदीची पायल, २ लाख ९० हजार रोख असा ऐवज लंपास केला.