

छत्रपती संभाजीनगर: तीन महिने मानधन रखडले, स्थायी समितीची मंजुरी मिळूनही मुदतवाढीचे आदेश मात्र प्रलंबितच होते. यामुळे महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका व सेविकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. दैनिक पुढारीने प्रशासनाच्या या दिरंगाईकडे रविवारी (दि.२७) लक्ष वेधल्यानंतर शिक्षण विभागाने सोमवारी (दि. २८) हालचाल करीत १०० बालवाडी शिक्षिका आणि पाच सेविकांच्या मुदतवाढीचे आदेश जारी केले. त्यामुळे तीन महिन्यांपासून रखडलेल्या मानधनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या शाळांमधील बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या सेवेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. समितीची मंजुरी मिळाल्यानंतरही पुढील प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून आदेश काढण्यास विलंब झाला. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले. मात्र, मुदतवाढीचे आदेश नसल्याने संबंधितांचे मानधन अदा करता आले नाही. ऐन सणासुदीच्या काळात तीन महिन्यांचे मानधन थकीत असल्याने बालवाडी शिक्षिका व सेविकांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
स्थायी समितीच्या मंजुरीनंतरही आदेश रखडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत होते. याबाबत दैनिक पुढारीने रविवारी वृत्त प्रसिद्ध करून प्रलंबित कार्यवाहीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले या वृत्ताची दखल घेत शिक्षण विभागाने प्रलंबित प्रक्रिया पूर्ण केली. मनपा प्रशासनाकडून सोमवारी १०० बालवाडी शिक्षिका आणि पाच सेविकांच्या मुदतवाढीचे आदेश काढण्यात आले. हे आदेश संबंधित महापालिका शाळांना पाठविण्यात आले आहेत.
या आदेशानुसार संबंधितांना दिवाळीच्या सुट्टीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी पुन्हा मुदतवाढीची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. दरम्यान, मुदतवाढीचे आदेश जारी झाल्याने तीन महिन्यांपासून थांबलेल्या मानधनाच्या देयकांना आता मंजुरीचा मार्ग खुला झाला आहे. संबंधितांचे थकीत मानधन लवकरच अदा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली.
एका वृत्ताने प्रशासनाला जाग
मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर असूनही आदेश निघत नसल्याने तीन महिन्यांपासून मानधन रखडले होते. दैनिक पुढारीने रविवारी या प्रश्नाला वाचा फोडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिक्षण विभागाने आदेश जारी केले. त्यामुळे बालवाडी शिक्षिका व सेविकांना ऐन सणासुदीच्या काळात दिलासा मिळाला आहे. त्यावरून महापालिका शिक्षण संघटना तसेच बालवाडी शिक्षिका व सेविकांनी दैनिक पुढारीचे आभार व्यक्त केले.
थकीत मानधनाला हिरवा कंदील
मुदतवाढीचे आदेश जारी झाल्याने १०० बालवाडी शिक्षिका आणि पाच सेविकांचे तीन महिन्यांपासून रखडलेले मानधन अदा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. स्थायी समितीची मंजुरी असूनही आदेश रखडल्याने मानधन थांबले होते. आता प्रशासकीय अडथळा दूर झाल्याने थकीत रक्कम लवकरच मिळण्याची शक्यता आहे.