

छत्रपती संभाजीनगर : माझी दुबईची कंपनी ट्रस्ट, गोशाळा आणि नवीन कंपन्यांना फंडिंग करते. तुम्ही दिलेल्या रकमेच्या तीन पट फंडिंग मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका भामट्याने शेतकऱ्यासह उद्योजकाला ५० लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार १८ मार्च रोजी सिडको भागातील एसबीआय बँकेसमोर घडला. अनिल गोविंदा शिंदे (रा. काळे गल्ली, आळंदी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
चंद्रभान बापूराव वटाणे (७२, रा. बजाजनगर, मूळ वलखेड, ता. परतूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते शेतकरी असून २०२१-२२ मध्ये त्यांचा नातू, नात, मुलीचे मुले हे पुणे येथे शिक्षणासाठी मुलीसोबत राहत असल्याने वटाणे नेहमी जात येत होते. त्यांच्या रूमच्या बाजूला आरोपी अनिल शिंदे राहत होता. त्याची ओळख झाल्यानंतर परिचय वाढला. तो स्वतः ची दुबईला कंपनी असल्याचे वारंवार सांगत होता.
लोकांना श्रीमंत होण्यासाठी कंपनीद्वारे पैशाचे वाटप करतो, ट्रस्ट, धर्मादाय संस्था यांना पैसे देतो. तुम्ही पाच लाख दिले तर मी तुम्हाला १५ लाख देईल, असे सांगून तुमच्याकडे किती पैसे आहेत? अशी विचारणा केली. तुमची कंपनी असेल तर रकमेच्या तीन पट कंपनी वाढविण्यासाठी देईल, असे आमिष दाखविले. एखादी कंपनी किंवा ट्रस्ट पाहा मी त्यांना पैसे देतो, असे तो नेहमी म्हणायचा. तुम्हाला कमिशनही देईल, असे तो सांगत असे. त्यामुळे वटाणे यांनी ओळखीचे रमेश गौतम पाईकराव (रा. हातेडी, ता. परतूर) यांची समर्थ फार्मर प्रोड्युसर कंपनीला पैशाची गरज असल्याचे शिंदेला सांगितले. तीन चार वेळा शिंदे हा बजाजनगर येथे त्याचा मेव्हणा सुशीलकुमार दिलीपराव तायडे, हरी नारायण महाजन सोबत येऊन गेला. त्याने दुबई येथील कंपनीच्या फंडिंगसाठी पैसे जमविण्यास सांगितले. पाईकराव यांनी त्यांच्या कंपनीचे सर्व कागदपत्रे, पाचशे रुपयांचे दोन कोरे बॉण्ड शिंदेला दिले.
५० लाख घेतल्यानंतर शिंदे वटाणे आणि पाईकराव यांना सिडको येथील एसबीआय बँकेसमोर घेऊन आला. कॅनरा बँकेचे आरटीजीएसद्वारे पैसे तुम्हाला पाठवतो. तुम्ही बँकेत जाऊन तोपर्यंत फॉर्म भरा, असे सांगितले. त्यामुळे दोघेही बँकेत आरटीजीएसची वाट पाहत बसले. तीन तास झाले तरी पैसे आले नाही. तेव्हा फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी सोमवारी (दि.१४) पोलिस आयुक्तांना तक्रार अर्ज दिला. त्यानंतर सिडको पोलिस ठाण्यात तात्कळ गुन्हा दाखल करण्यात आला.
वटाणे यांनी पाहुणे विलास शेळके, मित्र युवराज चावरे, देवाशीस प्रधान, आबासाहेब चिंतामणी असे सर्वांनी मिळून ५० लाख जमा केले. पाईकराव यांची कंपनी दाखविल्याने शिंदेने तुम्हाला दीड कोटी देतो, असे सांगितले. १८ मार्चला शिंदे पैसे घेण्यासाठी बजाजनगरला वटाणे यांच्या घरी आला. ५० लाख रुपये त्याने मोजून घेतले.