

छत्रपती संभाजीनगर : प्रमोद अडसुळे
स्मार्टफोन, इंटरनेट आणि डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर जितका फायद्याचा ठरत आहे, तितकाच तो धोकेदायकही बनला आहे. गेल्यावर्षी छत्रपती संभाजीनगर शहरातील सुमारे सहा हजार नागरिकांना सायबर गुन्हेगारांनी गंडवून तब्बल ५० कोटी रुपयांचा चुना लावला होता. त्यानंतरही नागरिकांचे प्रबोधन करूनही फसवणुकीचे प्रमाण कमी झालेले नाही.
फक्त पाच महिन्यांत जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत तब्बल २,५८० नागरिकांची सायबर फसवणूक होऊन त्यांना १५ कोटी ५७लाख रुपयांचा गंडा घातला. सायबर पोलिसांनी वेळीच पावले उचलून यातील 2 कोटी ५५ लाख रुपये विविध बँक खात्यांमध्ये फ्रीज केले असून, त्यातील ६९ लाख रुपये थेट तक्रारदारांच्या खात्यात परत करण्यात आले आहेत. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शहरातील सायबर गुन्हेगारीमध्ये डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन जुगार, क्रिप्टो करन्सी स्कॅम, डेटाबेस फसवणूक, बनावट पार्टटाइम जॉब, प्रेमसंबंधातून फसवणूक (लव्ह स्कॅम) यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
अनेक नागरिकांना केवायसी अपडेट, मोबाईल टॉवर भाड्याने देणे, विदेशातून गिफ्ट पाठवण्याचे आमिष, मकस्टम्समध्ये अडलेल्या वस्तूंसाठी पैसे भरणे अशा
बहाण्याने मोठ्या रकमा गमवाव्या लागत आहेत. शहरातील एका वृद्धाला सायबर भामट्याने राज्यातील आयपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांचा एआय चेहरा वापरून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता.
पोर्टल गृह मंत्रालयाने सुरू केलेले राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग (एनसीसीआरपी NCCRP cybercrime. gov. in) नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीसंबंधी ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा देते. या पोर्टलवर दाखल झालेल्या तक्रारी थेट संबंधित बँक आणि आर्थिक संस्थांना पाठवल्या जातात. त्यामुळे संबंधित बँक खाते तात्काळ फ्रीज करता येते.
नागरिकांना विविध आमिषे दाखवून त्यांचे बँक खाते रिकामे करणाऱ्या भामट्यांचे देशपातळीवर मोठे रॅकेट आहे. एखादा व्यक्ती जाळ्यात अडकला तर त्याच्या खात्यातून हरियाणा, केरळ, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, आसाम, मिझोराम, गुवाहाटी, पश्चिम बंगालयासह अन्य राज्यात असलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे वळते केले जातात. काही खाती भाड्यानेही घेतली जात असल्याने रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचे स्पष्ट होते. मात्र सायबर पोलिसांचा तपास तेथपर्यंत कधी गेलाच नाही.
यापूर्वी तक्रार मिळाल्यानंतर आम्हाला खात्याच्या तपशिलासाठी संबंधित बँकेशी थेट संपर्क साधावा लागायचा. त्यामुळे बराच वेळ जात असे. मात्र आता एनसीसीआरपी पोर्टलमुळे कमी वेळात बँक खाते गोठवण्याची प्रक्रिया करणे शक्य झाले आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगली तर फसवणूक होणार नाही किंबहुना पोलिसांना तातडीने माहिती दिली तर मोठ्या प्रमाणावर नुकसान टाळता येऊ शकते. - शिवचरण पांढरे, पोलिस -निरीक्षक, शहर सायबर ठाणे
अनोळखी कॉल, लिंक, ईमेल, मेसेज यावर विश्वास ठेवू नका.
कोणतीही माहिती (आधार, ओटीपी, कार्ड नंबर) शेअर करू नका.
केवायसी अपडेट, अकाऊंट फ्रीझ, क्रेडिट कार्ड ब्लॉक अशा कॉल्सला बळी पडू नका.
शंका आल्यास सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० किंवा जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधा.