

कन्नड - तालुक्यातील पळसखेडा येथे उसाच्या शेतात बिबट्याची तीन ते चार पिल्ले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ऊसतोडणी सुरू असताना ही पिल्ले मजुरांच्या निदर्शनास आली.
पळसखेडा येथील शेतकरी अण्णा शंकर पवार यांच्या गट क्रमांक ६७ मधील शेतात सध्या ऊसतोडणीचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ऊसतोड मजूर शेतात गेले असता, उसाच्या सरीमध्ये त्यांना बिबट्याची पिल्ले दिसून आली. मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार, पिल्लांची संख्या तीन ते चार असल्याचा अंदाज आहे.
उसाच्या शेतात बिबट्याची पिल्ले आढळल्याची माहिती परिसरात पसरताच शेतकरी व ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिल्लांची आई असलेली मादी बिबट्या परिसरातच असण्याची शक्यता असल्याने शेतात जाणे धोकादायक ठरू शकते. या घटनेची वनविभागाने तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पाहणी करावी. तसेच पिल्ले व मादी बिबट्याच्या सुरक्षिततेसह नागरिक आणि ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.