

Sambhajinagar Talathi, Circle Officer Hastily Suspended
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त
सेवा : नियमबाह्य वाळू उपशाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी गंगापूर तालुक्यातील सणव येथील ग्राम महसूल अधिकारी उज्ज्वला ठोंबरे आणि डोणगावचे मंडळ अधिकारी सुभाष वाघ या दोघांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (दि.४) सायंकाळी याबाबतचे आदेश जारी केले.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक व उपसा होत आहे. मात्र, महसूल आणि गौण खनिज विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी स्वामी यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तहसील व उपविभागीय स्तरावर भरारी पथके स्थापन करुन वाळू घाट, दगड खदानी, विटभट्टी तसेच अवैध मुरूम उत्खननाच्या ठिकाणांना आकस्मिकपणे भेटी देऊन तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
त्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नव्हता. त्यात गंगापूर तालुक्यातील सनव येथील वाळू पट्टयातून नियमबाह्यपणे वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी स्वामी यांनी बुधवारी तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यासंदर्भात संबंधित ग्राम महसूल अधिकारी उज्वला ठोंबरे आणि डोणगावचे मंडळ अधिकारी सुभाष वाघ यांनी वरिष्ठांना कोणताही अहवाल सादर केलेला नव्हता हे देखील स्पष्ट झाले. त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी उज्वला ठोंबरे आणि मंडळ अधिकारी सुभाष वाघ या दोघांनाही बुधवारी सायंकाळी तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) नुसार प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करून सुभाष वाघ आणि उज्ज्वला ठोंबरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन काळात सुभाष वाघ यांना छत्रपती संभाजीनगर तर ठोंबरे यांना वैजापूर तहसील कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे. या दोघांनाही निलंबन आदेशापासून ३ महिन्यांपर्यंत त्यांच्या वेतनाच्या ५० टक्के या दराने निर्वाह भत्ता देण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी आपल्या आदेशात नमूद केले आहे.