

Change the mindset of differentiating between boys and girls: Sanjay Shirsat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जन्म देणारी आई, आयुष्यभर साथ देणारी पत्नी, जिव्हाळा लावणारी बहीण हवी असताना मुलीचा जन्म नको, ही मुला-मुलींत भेद करणारी मानसिकता बदला, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी पंढरपूर येथे केले.
कन्या जन्माचे स्वागत करून मुलींचा जन्मदर वृद्धिंगत करण्यास चालना देण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून गुरुवारी जिल्हाभरात कन्या सन्मान दिवस साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व मंडळ मुख्यालयाच्या ठिकाणी यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास स्वतः पालकमंत्री संजय शिरसाट यांची उपस्थिती होती.
पंढरपूर सरपंच वैशाली राऊत, वळदगावचे सरपंच अमर राजपूत, वडगावचे सरपंच सुनील काळे, पाटोदाचे सरपंच कपिंद्र पेरे, तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे, अपर तहसीलदार डॉ. परेश चौधरी, गटविकास अधिकारी मीना रावताळे, विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, अॅड. ललित शिरसाट, डॉ. श्रद्धा स्वामी, विकास जैन आदी यावेळी उपस्थित होते.
मुलीच्या वळदगावात जन्मानंतर २१०० रुपये मातेस देण्याची योजना राबविली जाते. त्याअंतर्गत मातांना २१०० रुपयांचा धनादेश पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. अॅड. शिरसाट यांनी प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. तसेच डॉ. स्वामी यांनी महिलांच्या आरोग्याविषयक माहिती दिली. आशासेविका पूजा साळवे यांनी तसेच विद्यार्थिनी पूजा पवार यांनी मनोगत व्यक्त केले.
पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, मुलगा मुलगी समानता ही फक्त बोलण्याची गोष्ट नसून ती कृतीत आणणे आवश्यक आहे. समाजात मुलगा मुलगी भेद करण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. आई, बहीण, पत्नी आवश्यक असते. मग मुलगी का नको ? मुलांपेक्षा मुली सर्वच क्षेत्रात सरस आहेत. मुलींनी मिळविलेल्या यशाचे कौतुक करा. तिचे लाड करा. मुलापेक्षा मुलगी हीच म्हातारपणाचा आधार ठरते, हे मी अनेक ठिकाणी पाहतो. मुलगाच हवा हा दुराग्रह नको, असे पालकमंत्री म्हणाले. प्रास्ताविक डॉ. व्यंकट राठोड यांनी केले तर शिवानंद बिडवे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले.