

CEO angry over teacher's unauthorized absence
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील पांगरा जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाच्या दीर्घकालीन गैरहजेरीच्या प्रकरणावरून गुरुवारी (दि. १६) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाला धारेवर धरत मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी कठोर भूमिका घेतली. संबंधित केंद्रप्रमुखांचे वेतन कापण्याचे आदेश देतानाच कन्नड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून शुक्रवारी जिल्हा परिषदेत हजर राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदस्या दीपाली राजपूत यांनी पांगरा शाळेतील शिक्षक भगवान बोराडे हे २०१९ पासून शाळेत अनुपस्थित असल्याचा मुद्दा उपस्थित केला. शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
मात्र, यावर नाराजी व्यक्त करत मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी थेट जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले. बैठकीत शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दाही ऐरणीवर आला. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत सदस्य मनोज गायके, पंकज ठोंबरे आणि संजय निकम यांनी व्यक्त केली.
काही ठिकाणी लोकवर्गणीतून खासगी शिक्षकांची नियुक्ती करण्याची वेळ आल्याचेही त्यांनी सांगितले. यावर शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी आठ दिवसांत शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान देभेगाव अंतर्गत केसापूर येथील शाळा व अंगणवाडीच्या स्वच्छतागृहात साप निघाल्याची बाब दीपाली राजपूत यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. परिसरात बिबट्यांचाही वावर असल्याचे त्यांनी सांगितले. यावर ग्रामपंचायतींनी स्वतःच्या निधीतून स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करावी, असे निर्देशही सीईओ यांनी दिले.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेत्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्याची मागणी मनोज गायके यांनी केली. सर्व पक्षांना समान वागणूक मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावर अध्यक्ष अविनाश गलांडे व बांधकाम सभापती सचिन गरड यांनी स्वतंत्र दालनाची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
अंगणवाड्या केवळ खिचडीपुरत्या नकोत
अंगणवाड्यांमध्ये केवळ पोषण आहार न देता मुलांवर संस्कार, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण पूर्वशिक्षणावर भर दिला जावा, अशी अपेक्षा जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांनी व्यक्त केली. अंगणवाड्यांची भूमिका सर्वांगीण बालविकासाची असली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.