

Case Registered Against Eight Consumers for Illegally Reconnecting Disconnected Power Supply
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : थकबाकीपोटी खंडित केलेला वीज पुरवठा बेकायदेशीररीत्या परस्पर जोडणे नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. या 1 प्रकरणी शहरातील ८ जणांवर महावितरणच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थकबाकीदारांना दणका महावितरणने वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांविरोधात सध्या धडक मोहीम सुरू केली आहे. यामध्ये वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे. तसेच कारवाई केलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडितच आहे की नाही, याची वेळोवेळी पडताळणी केली जात आहे.
अशी कारवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी अधिकृतपणे थकबाकी भरूनच वीज पुरवठा सुरू करून घ्यावा, परस्पर वीज जोडू नये, असे आवाहन मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.
यांच्यावर झाली कारवाई...
▶ पैठणगेट व खोकडपुरा परिसर : सब्जीमंडीत राहणारे ग्राहक शेख मजहर शेख मुनीर बागवान, बशीर फतेह एम.डी. व मोहंमद उस्मान खान, तसेच समतानगरातील सुभाष किसन झोंबाडे यांचा वीज पुरवठा थकबाकीमुळे काही दिवसांपूर्वीच खंडित करण्यात आला होता. मात्र त्यानंतर त्यांनी अनधिकृतरीत्या परस्पर वीज जोडून घेतल्याचे समोर आले. या प्रकरणी सहायक अभियंता सूरज मेंढे यांच्या तक्रारीवरून सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
▶ चिकलठाणा व नारेगाव परिसर अमिना पार्क येथील ग्राहक सैदाबी शेख मुनाफ, नारेगाव येथील सुरय्याबी शेख महेबूब आणि सिडको एन-२ परिसरातील भरत काशिनाथ दुगम यांनीही बेकायदेश-ौररीत्या वीज पुरवठा सुरू केल्याचे आढळले. सहायक अभियंता ज्ञानोबा राठोड यांच्या फिर्यादीवरून सिडको पोलिस ठाण्यात या तिन्ही ग्राहकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
▶ छावणी परिसर : गुड्डीगुडम येथील दिलीप सुदाम सुतार या ग्राहकानेही परस्पर वीज पुरवठा जोडून घेतला होता. त्याच्याविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.