

Case registered against two for defacing the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील चौक, वाहतूक बेट, महापुरुषांच्या पुतळ्यालगत आणि विद्युत खांबांवर अनधिकृतरीत्या जाहिरात फलक लावणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. यात शनिवारी गारखेडा आणि मिलकॉर्नर परिसरात अनधिकृतरीत्या लावलेल्या फलकाविर-ोधात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काढताना मुकुंदवाडी येथे अनधिकृत पोस्टर महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला. त्यानंतर महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी शहरात अनधिकृत जाहिरात फलकांसह पोस्टर आणि होर्डिंगविरोधात कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याअंतर्गत शहरात अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर लावणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनधिकृत जाहिरात फलक, बॅनर लावून महापालिका जाहिरात कराचे नुकसान करणे शहराचे विद्रुपीकरण करणे याबाबत कारवाई करण्यात येत आहे.
शनिवारी (दि. २१) झोन क्रमांक ७अंतर्गत सहायक आयुक्त विलास भणगे व स्वच्छता निरीक्षक सचिन ठोकळ हे सूतगिरणी चौक ते शिवाजीनगर या मार्गावर गस्त घालत असताना सूतगिरणी चौक येथे शासकीय जागेवर अज्ञात व्यक्तींनी मनपाची परवानगी न घेता शुभेच्छा जाहिरात फलक लावून विद्रुपीकरण केले. यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनापरवाना लावले फलक
झोन क्रमांक १ अंतर्गत स्वच्छता निरीक्षक गौतम कांबळे व बंडू साबळे हे मिल कॉर्नर ते बारापुल्ला गेट या मार्गावर गस्त घालत असताना या रस्त्याच्या दुभाजकावर भाई इम्तियाज व रफ्तार यार खान यांनी महापालिकेची परवानगी न घेता विद्युत खांबावर अनधिकृतपणे शुभेच्छा जाहिरात फलक लावून विद्रुपीकरण केल्याने त्यांच्याविरुद्ध कलम ३ प्रमाणे व महाराष्ट्र मनपा अधिनियम १९४९ चे कलम २४४ , २४५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.