

Case filed against six people including husband for inciting woman to end her life
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा: एका ३६ वर्षीय महिलेचा शारीरिक तसेच मानसिक छळ करून तिला जीवन संपविण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अरुणाचा विवाह २००८ मध्ये दत्ता वाहूळकर याच्या सोबत झाला होता. त्यानंतर २०१० मध्ये दत्ता हा कामाच्या शोधात पत्नीला सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगरात आला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. दरम्यान दत्ताला दारूचे व्यसन जडल्याने विनाकारण तो पत्नीला त्रास देऊन मारहाण करत असे. यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून अरुणा तीन महिन्यांपूर्वी दोन्ही मुलांना सोबत घेऊन ती माहेरी भावाकडे राहण्यास गेली होती.
त्यानंतर जून महिन्यात मुलाच्या शिक्षणासाठी अरुणा बजाजनगर येथे राहण्यास आली. पत्नी बजाजनगरात राहण्यास आल्याचे दत्ताला समजले. पत्नीचा पत्ता शोधून त्याने अरुणाला पुन्हा त्रास देणे सुरू केले. पती व सासरच्या मंडळी तिला विनाकारण त्रास देत असल्याने जगावेसे वाटत नाही, असे तिने तिच्या भावाला अनेक वेळा सांगितले होते. शनिवारी रक्षाबंधन सण असल्याने मुलांना सोबत घेऊन अरुणा कमळापूर येथे पतीकडे गेली होती.
त्याच रात्री अकरा वाजेच्या सुमारास दत्ता याने पुन्हा दारू पिऊन पत्नी अरुणाला शिवीगाळ करून मारहाण केली. यामुळे अरुणाचे दोन्ही मुले दुसऱ्या दिवशी सकाळी बजाजनगर येथे निघून आले तर अरुणा कमळापूर येथे पतीकडे थांबली होती. पती दारू पिऊन नेहमी मारहाण करत असल्याने अरुणाने सायंकाळी गळफास घेऊन जीवन संपविले. या प्रकरणी मयत अरुणाचा भाऊ प्रमोद मगरे याने दिलेल्या तक्ररीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अरुणाचा पती दत्ता वाहूळकर, सासू सोनाबाई, सासरे अंकुशराव, दीर अनिल, नणंद वंदना रगडे, भाऊसाहेब रगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.