

Work Seek Line momentum; work on the Stable Line will begin soon
छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा बहुचर्चित असलेल्या पिटलाईनचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ती एका महिन्याभरात कार्यरत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याबरोबरच सीक लाईनच्या कामाला वेग आला असून आता लवकरच स्टेबल लाईनचे काम हाती घेण्यात येणार आहे. शिवाय दुसऱ्या पिटलाईनचेही नियोजन याच परिसरात केले असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पिटलाईन कार्यरत झाल्यानंतर अनेक गाड्यांच्या देखभालीचे काम होणार आहे. रेल्वेच्या इतर देखभाल दुरुस्तीसाठी सीक लाईनही आवश्यक आहे. त्याचबरोबर स्टेबल लाईनचीही आवश्यक्ता आहे. त्यानुसार सीक लाईनचे कामाने वेग घेतला असून लवकरच स्टेबल लाईनचेही काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान सध्या बनवण्यात आलेल्या पिटलाईनच्या इलेक्ट्रिक कामे अपूर्ण आहेत. ही कामे एक महिन्यात पूर्ण करून पिटलाईन कार्यरत करण्याचा प्रयत्न असल्याचीही माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
दुसऱ्या पिटलाईनचे नियोजन
याच परिसरात दुसरी पिटलाईन बनवण्याचे नियोजन सुरू असून ही लाईन मालधक्क्यांच्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे. दोन पिटलाईन, एक सीक व स्टेबल लाईन कार्यरत झाल्यानंतर येथे देखभाल दुरुस्ती व इतर कामे येथेच होणार आहेत.
या नवीन रेल्वेच्या अपेक्षा
पिटलाईन व सीकलाईन पूर्ण करून या ठिकाणांहून यशवंतपूर, बेंगळूरु बाय विकली, सुरत अहमदाबाद-जोध-पूर - घृष्णेश्वर सुपरफास्ट एक्स्प्रेस, मडगाव ते तिरुणांतपूरम बाय विकली, नागपूर मार्गे पूर्णा, अकोला, अमरावती डेली आदी गाड्या सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून रेल्वेप्रेमींकडून होत आहे. या गाड्यांबाबत जिल्ह्यासह मराठवाड्यातील रेल्वेप्रेमींच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
पिटलाईन असते वॉशिंग लाईन
पिटलाईन ही वॉशिंग लाईन असते. याचा वापर कोचच्या बेस पार्ट्सची तपासणी, डब्यांतील सांडपाणी बाहेर काढणे, अंडर फ्रेम, रनिंग गेट, सस्पेंशन, बफरस ब्रेक, कोचमनचे मेन डोअर, खिडक्यांची तावदाने, आदी तपासणीने काम येथे केले जाते. सीक लाईनमध्ये रेल्वेतील बिघाड शोधून त्याची दुरुस्ती केली जाते. त्यासाठी ही लाईन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.