

Case filed against parents of two in child marriage case
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा एका १४ वर्षीय मुलीसोबत लग्न करून तिला गर्भवती करणाऱ्या तरुणाविरुद्ध व त्यांचा बालविवाह लावून देणाऱ्या तरुणाच्या तसेच पीडित मुलीच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुलताबाद तालुक्यात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन पीडितेचा साखरपुडा एप्रिल महिन्यात पवन बोडखे (रा. रांजणगाव शे.पु.) याच्या सोबत झाला होता.
सविता अल्पवयीन आहे, हे माहीत असताना तिच्या व पवनच्या आई वडिलांनी जून महिन्यात त्यांच्या लग्नाची तारीख पक्की केली होती. दरम्यान सविता ही रांजणगाव येथे असताना पवन व सविता यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले होते.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे २ जून रोजी घरच्यांनी सविता व पवन यांचे रांजणगाव येथे घरच्या घरी लग्न लावून दिले. या बालविवाहाची माहिती बाल कल्याण समिती व दामिनी पथकास मिळाल्याने पथकाने ३ जून रोजी सविताला शहरातील बालगृहात टाकले होते.
दोन-तीन दिवसांपूर्वी पोटात त्रास सुरू झाल्याने पोलिसांनी सविताला उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले. तपासणीत ती गरोदर असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोउनि भाग्यश्री शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पवन बोडखे त्याचे आई-वडील तसेच पीडित मुलीच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.