Tap Connections : मिसारवाडीतून होणार नो नेटवर्क भागांतील नळजोडणी मोहिमेला प्रारंभ

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या वाढीव पाण्यावर भर : एसओपीनुसार टप्प्याटप्प्याने देणार जोडण्या
Tap Connections
Tap Connections : मिसारवाडीतून होणार नो नेटवर्क भागांतील नळजोडणी मोहिमेला प्रारंभfile Photo
Published on
Updated on

Campaign to provide tap connections in 'no-network' areas to launch from Misarwadi

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहरात वाढीव पाणी उपलब्ध होण्यास सुरुवात झाल्याने अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा व्यवस्थेपासून वंचित असलेल्या नो नेटवर्क भागांमध्ये नळजोडण्या देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात मिसारवाडी परिसरातून करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Tap Connections
Water Supply : शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याची डेडलाईन पुन्हा हुकण्याची शक्यता

शहरातील मोठा भूभाग अद्याप नियमित जलवाहिनी जाळ्याशी जोडलेला नसल्याने हजारो कुटुंबांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक भागांत जलवाहिन्यांचे जाळेच उपलब्ध नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नव्या योजनेतून पाणीपुरवठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे आता या भागांना मुख्य प्रवाहात आणण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. याबाबत माहिती देताना आयुक्त येडगे यांनी सांगितले की, नो नेटवर्क भागात नळ जोडण्या देण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती (एसओपी) तयार केली जाणार आहे. त्याआधारे अधिकृत प्लंबरांच्या माध्यमातून जोडण्या देण्याचे काम हाती घेतले जाईल.

Tap Connections
Water Supply : सिडकोला १५०० च्या जलवाहिनीतून होणार पुरवठा

यासंदर्भात प्लंबर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्राथमिक चर्चाही करण्यात आली आहे. तसेच मिसारवाडी हा परिसर नो नेटवर्क क्षेत्रात मोडत असल्याने तेथून या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर भागांमध्येही नळजोडण्या दिल्या जाणार आहेत. त्यासाठी नक्षत्रवाडी डोंगरावरील संतुलित जलकुंभातून (एमबीआर) टाकण्यात आलेल्या २००० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे या भागांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

तसेच ११०० आणि १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांशी जोडलेल्या विविध जलकुंभांच्या कार्यक्षेत्रातील नो नेटवर्क वसाहतींनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. संपूर्ण प्रक्रिया महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या देखरेखीखाली राबविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टँकरवरील अवलंबन कमी होण्याची अपेक्षा

शहरातील अनेक नो नेटवर्क वसाहतींमध्ये आजही नियमित जलवाहिनी व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून या भागांना नळजोडण्या मिळाल्यास नियमित पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा होणार असून, टँकरवरील खर्च आणि त्यावरील अवलंबन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news