

Bulldozers will be roaming in Mukundwadi once again today
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडीतील हत्येच्या घटनेनंतर पोलिस व महापालिका प्रशासनाने संयुक् तरीत्या मोहीम राबवत २२९ अतिक्रमित दुकाने, हॉटेल्स जमीनदोस्त केली. त्यानंतर व्यावसायिकांसह निवासी नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे आज मंगळवारपासून महापालिका व पोलिस प्रशासन मुकुंदवाडी ते चिकलठाणादरम्यान दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड व ग्रीन स्पेसमधील सर्व अतिक्रमणांवर बुलडोजर चालवणार आहे.
महापालिका प्रशासनाने खंडपीठाच्या आदेशावरून शहरातील मुख्य रस्त्यांवर असलेल्या अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यात प्रामुख्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण जमीनदोस्त केले जात आहे. दोन आठवाड्यांपूर्वीच प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने बीड बायपास रस्त्यावर कारवाई करीत तब्बल सव्वाचारशेहून अधिक अतिक्रमण भुईसपाट केले.
यात देवळाई चौक ते महानुभव आश्रमादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेला सर्व्हिस रोड मोकळा करण्यात आला. या कारवाईनंतर मुकुंदवाडी महापालिका ते चिकलठाणादरम्यान असलेला सर्व्हिस रोड मोकळा करणार होती. परंतु गुरुवारी मुकुंदवाडी चौकात खुनाची घटना घडली आणि अतिक्रमणामुळे हा प्रकार घडल्याचे कळताच पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी संयुक्तरीत्या मुकुंदवाडीत मोहीम राबवून येथील तब्बल २२९ अतिक्रमणावर बुलडोजर चालविला. दिवसभर राबविलेल्या मोहिमेनंतर महापालिकेने शुक्रवारी सायंकाळी येथील व्यावसायिक व निवासी नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली.
त्यानुसार सोमवारी कारवाई अपेक्षित होती, परंतु सोमवारी जनअक्रोश मोर्चा असल्याने पोलिस यंत्रणा मोर्चाच्या बंदोबस्तात व्यस्त होती. त्यामुळे आज मंगळवारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.