

Bull dies after being tied to tractor and dragged
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बैलाला ट्रॅक्टरला बांधून ओढत नेल्याने गंभीर जखमी होऊन बैल दगावला. ही निर्दयी घटना बुधवारी (दि. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास जाधववाडी मंडीत घडली. युसूफ खॉ फुलखॉ पठाण आणि त्याचा मुलगा शफिक खॉ पठाण (दोघे रा. मिसारवाडी गल्ली क्र. १०) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी ओम दिनेश घोडके (२१, रा. पिसादेवी) याच्या तक्रारीनुसार, तो शिक्षण घेत असून, गोरक्षक दलामध्ये पाच वर्षांपासून काम करतो. बुधवारी घरी असताना त्याला मित्राने संपर्क साधून एका बैलाला जाधववाडी मंडी येथून ट्रॅक्टरने ओढत घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यामुळे ओम त्याचा मित्र वैभव सोनवणेसोबत जाधववाडी मंडीच्या कमानीजवळ गेला.
तिथे त्याला एक काळसर लाल रंगाचा बैल मृतावस्थेत दिसला. बैलाच्या गळ्याची दोरी ट्रॅक्टर ट्रॉलीला बांधलेली होती. तिथे असलेल्या कापसेने आरोपींनी बैलाला ट्रॅक्टरला बांधून ओढत नेल्याने तो जखमी होऊन दगावल्याची सांगितले. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यासह अन्य कलमाखाली गुन्हा नोंद झाला.