

Municipal Corporation will now install meters on water taps in every house
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून आता घरोघरी नळांना मीटर बसवले जाणार असून, त्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या समन्वयातून सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यातील २०० एमएलडी पाणी डिसेंबर अखेरीस उपलब्ध झाल्यानंतर मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्याचा मनपा प्रशासनाचा मानस असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी २५०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य पाइपलाइनसह नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी सुमारे २७४० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, योजनेतून ३९५ एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील २०० एमएलडी पाणी डिसेंबर अखेरीस शहरात उपलब्ध करून देण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर शहरवासीयांना दररोज २४ तास पाणी मिळेल, असा दावा महापालिकेकडून करण्यात येत आहे.
सतत पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून वापर-लेल्या पाण्याचे अचूक मोजमाप व्हावे, तसेच पाणी बचतीस चालना मिळावी, या उद्देशाने प्रत्येक नळ कनेक्शनसाठी वॉटर मीटर बसविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संपूर्ण योजनेच्या खर्चात वॉटर मीटरसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या निधीतून डीपीआर तयार करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात समन्वय साधला जात आहे. डीपीआर तयार करण्यासाठी लवकरच समन्वयकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने या नियुक्तीची तयारी सुरू केली असून, पहिल्या टप्प्यातील २०० एमएलडी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर वॉटर मीटर प्रकल्पाच्या कामाला गती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.