

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पैठणगेट भागातील सब्जी मंडीकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये मोबाईल शॉपीवर किरकोळ वादातून एका तरुणाची निघृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.१०) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. इमरान अकबर कुरेशी (३३, रा. सिल्लेखाना) असे मृताचे नाव असून, आरोपी परवेज शेख व अन्य आरोपी पसार झाले आहेत.
घटनेनंतर परिसरात शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्याने तणाव निर्माण झाला. जमावाने आर-ोपीच्या घरासमोर तीन वाहने फोडली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह दंगा काबू पथकाला पाचारण करण्यात आले होते.
क्रांती चौक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहा वाजेदरम्यान पैठणगेट समोरील सब्जीमंडीकडे जाणाऱ्या गल्लीत असलेल्या एस एस टेलिकॉम या मोबाईल दुकानात व्यावसायिक व छोटी मोठी कामे करणारे इमरान कुरेशी व त्याचा भाऊ इब्राहिम हे आरोपीच्या दुकानात गेले होते. तिथे आरोपी परवेज सोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन आरोपी परवेज शेख आणि त्याच्या साथीदारांनी थेट धारदार शस्त्र उपसून इमरानवर सपासप वार केले.
चाकू गळ्यात खुपसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला, तर इम्रानचा भाऊ इब्राहिम हाही सोबत असल्याने त्याच्यावरही वार झाल्याने तोही जखमी झाला. इमरान या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला. घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात हलवला आहे. दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे पैठणगेट परिसरात तणावपूर्ण वातावरण होते.
क्युआर्टी पथकाने धाव घेतली
दिल्ली स्फोटाच्या घटनेनंतर पैठणगेट भागात क्युआर्टी पथक तैनात करण्यात आले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास मोबाईल शॉपीत राडा होताच जवानांनी धाव घेतली. नियंत्रण कक्षाला माहिती दिली. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.
आरोपीच्या दुकान, घरावर दगडफेक
संतप्त जमावाने आरोपी परवेजच्या घरावर आणि दुकानावर दगडफेक केली. दुकानाची तोडफोड करून सब्जीमंडी गल्लीत, बागवान मशीदसमोर उभ्या ऑडी, सेन्ट्रो कार आणि एका रिक्षाच्या काचा फोडल्या.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त पंकज अतुलकर, सहायक आयुक्त सागर देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक सुनील माने, सिटी चौक ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
घाटीतही जमाव आक्रमक
इमरानला जखमी अवस्थेत घाटीत हलविण्यात आले. त्यानंतर जमाव घाटीत गेला होता. तिथेही जमाव आक्रमक झाला होता. पोलिसांवरही जमाव घाऊन गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
रस्त्यावर रक्ताचे पाट
इमरान आणि इब्राहिम या दोन भावांवर धारदार शस्त्राने वार झाल्याने पैठणगेट लगत एस एस टेलिकॉम दुकानासमोर रक्ताचे पाट वाहिले. फॉरेन्सिक पथक पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.