

Sambhajinagar on alert mode after Delhi blast
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दिल्ली येथे सोमवारी (दि.१०) रात्री कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाच्या घटनेत १० जणांचा मृत्यू, तर २५ जण गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. विमानतळ, रेल्वेस्टेशन, सर्व पर्यटनस्थळांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त सुरु आहे.
यासोबतच सर्व सुरक्षा यंत्रणाना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी सांगितले. याच बरोबर बॉम्ब शोधक-नाशक (बीडीडीएस) पथकाला नियमित ठिकाणी तपासणी करण्याच्या आणि सर्व ठाणेदारांना हद्दीत स्वतः रात्री उशिरापर्यंत गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहारत दोन दिवस चालले एनएसजीचे मॉकड्रील
राष्ट्रीय सुरक्षारक्षक (एनएसजी) व छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण पोलिस दलातर्फे ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान संयुक्त दहशतविरोधी सुरक्षा सराव आयोजित करण्यात आला होता. वेरूळ लेणी, घृष्णेश्वर मंदिर, जालना रोडवरील पंचतारांकित हॉटेल येथे मुंबई एनएसजी ग्रुपचे कमांडर कर्नल अभिषेक सिंग यांच्या नेतृत्वात सराव संपन्न झाला. पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून निरीक्षण नोंदविले.