

Break in action against adulterators
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सुरुवातीच्या धडाक्यानंतर आता एफडीएची कारवाई मंदावल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरात तर अगदी बोटांवर मोजण्या इतक्याच कारवाया झाल्या आहेत.
त्यावरच टिमकी वाजवण्यात अधिकारी मग्न असल्याने भेसळीचा गोरखधंदा थांबलेला नाही. शहरात ठिकठिकाणी उघड्यावरच अस्वच्छ, दुर्गंधीमध्ये खाद्यपदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. यासह सुट्टे तेल, दूध डेअरी, मोठे हॉटेल्स, मिठाई, बेकऱ्या, आईस्क्रीम सेंटर अशा असंख्य ठिकाणी एफडीएने तपासणीही केलेली नाही. त्यामुळे हजारो ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या आस्थापनांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अन्न व औषधी (एफडीए) प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे आल्यापासून सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या विशेष मोहिमेअंतर्गत राज्यभर कारवाईचा धडाका सुरू आहे. गुटखा माफिया आणि खाद्य, अन्न पदार्थांमध्ये भेसळ करून ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात कारवाईचा फास आवळला जात आहे.
राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये अन्न सुरक्षेचे नियम न पाळणाऱ्या, अस्वच्छता असलेल्या आणि विनापरवाना चालणाऱ्या रेस्टॉरंट्स, बेकऱ्यांवर कठोर छापे टाकले जात आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही विभागाकडून गुटखा माफियासह हॉटेल्स, ज्यूस सेंटर, तेल कारखाने, उपहार गृहांवर कारवाई केल्या जात आहे. त्यांचे परवानेही रद्द केले आहेत. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते.
अनेकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे आणि नियमांचे पालन सुरू केले. मात्र मोजक्याच ठिकाणी बोटांवर मोजण्या इतक्याच कारवाया त्याही संथगतीने होत असल्याने शहरातील खाद्य, अन्न पदार्थ विक्रेते पुन्हा निर्वावले आहेत. तर भेसळ करणाऱ्या अनेकांना रान मोकळे झाले आहे. त्यामुळे अन्न प्रशासनाला संपूर्ण शहरात तपासणी, धाडसत्र आणि धडक कारवाईचा वेग वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान ५ ऑगस्ट रोजी - कन्नड येथे गुटख्यासह पाच लाख १८ हजारहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.
मोजक्याच कारवाईचा गाजावाजा
शहरात लहान-मोठे शेकडो हॉटेल्स, रेस्टॉरंट, नास्ता सेंटर आहेत. अनेक ठिकाणी आईस्क्रीम पार्लर, ज्यूस सेंटर, मिठाई, फरसाणसह हजारो खाद्य व अन्न पदार्थ विक्रेते आहेत. मोजक्याच प्रातिनिधिक कारवाईचा गाजावाजा करून एफडीए पथकाने यापैकी बहुतांश ठिकाणी साधी तपासणीही केलेली नाही.
या आस्थापनांवर कारवाई
दिनांक - आस्थापना २ जुलै - ज्यूस सेंटर, यल्ला-यल्ला व आईच्या गावात हॉटेल ३ जुलै - पीईएस इंजिनिअरिंग वसतिगृह कॅन्टीन ७ जुलै - कन्नड भेसळयुक्त गुळाचा साठा ९ जुलै - फुलंब्री येथे सिद्धेश्वर दूध डेअरी ११ जुलै - बागारिया तेल कंपनी २२ जुलै- उत्तम उपहार गृह २४ जुलै - यस बेकरीवर कारवाई २८ जुले - मोती कारंजा, नवाबपुरा येथे गुटखा पकडला ३० जुलै - अमोल आणि लक्ष्मी डेअरीवर कारवाई