

Bogus Voter List Sillod :
राज्यात सत्ताधारी महायुतीमध्येच मतदार यादीतील कथित गैरप्रकारांवरून मोठा संघर्ष उभा राहिला आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी थेट शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात उपोषण सुरू केले आहे.
अब्दुल सत्तार यांच्या दबावामुळे सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि हेराफेरी होत असल्याचा भाजपचा मुख्य आरोप आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी तयार केलेल्या यादीत बोगस नावे इकडून तिकडे हलवण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक ४ मध्ये जे लोक राहात नाहीत, अशा सुमारे हजार लोकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
प्रभाग क्रमांक ८ मध्ये जिथे प्रत्यक्षात केवळ चारच घरे आहेत, तिथे ९५० नावे दाखवण्यात आली आहेत. शिक्षक कॉलनीमध्ये राहणाऱ्या लोकांची २०० ते २५० नावे बाहेरच्या भागात दाखवण्यात आली आहेत.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आरोप केला आहे की, आमदार अब्दुल सत्तार हे मागील निवडणुकीत मयत झालेल्या लोकांच्या मतदानावर निवडून आले आहेत. "जे मयत झालेले लोक होते, त्यांच्या नावावर त्यांनी मतदान केलेले (करून घेतलेले). त्याच्यावरती 'मरेल माणसावर निवडून आलेला आमदार' असेल तर तो आमदार अब्दुल सत्तारे," असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.
मतदार यादीत समाविष्ट केलेली सर्व बोगस नावे तात्काळ वगळण्यात यावीत. सिल्लोड नगरपरिषदेत अब्दुल सत्तार यांचा गेल्या २०-२५ वर्षांपासून दबाव आहे. त्यामुळे येथे आयएएस (IAS) दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा. या आयएएस अधिकाऱ्याच्या उपस्थितीमध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया पार पाडली जावी.
भाजप नेत्यांनी सत्तार हे मित्रपक्षाचे असले तरी मतदार यादीतील हेराफेरी खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या उपोषणाने महायुतीमधील अंतर्गत तणाव चव्हाट्यावर आला आहे.