

छत्रपती संभाजीनगर : सुनील कच्छवे
उपविभागीय अधिकारी कार्यालयाने गेल्या दोन वर्षांत शहरात शेकडो जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे वितरित केली. त्यातील १३२५ जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. जन्माचा सबळ पुरावा दाखल केलेला नसताना ही प्रमाणपत्रे वितरित केल्याचा ठपका महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेल्या अहवालात ठेवला आहे. या सर्व अर्जदारांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात हजारो बांगलादेशींना बोगस जन्म प्रमाणपत्रे वितरित झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मागील काही महिन्यांपासून सोमय्या हे या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून आतापर्यंत वितरित प्रमाणपत्रांचा फेरआढावा घेण्यात येत आहे. सोमय्या यांनी मनपाकडेही याबाबत हरकत नोंदविली होती. त्यानंतर महापालिकेने छत्रपती संभाजीनगर शहरात वितरित प्रमाणपत्रांच्या अनुशंगाने अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. १ नोव्हेंबर २०२३ ते १८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत वितरित १४९५ अजपैिकी १३२५ प्रकरणात मनपातर्फे अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार, प्रमाणपत्र वितरित केलेल्यांपैकी ८२५ अर्जदारांनी महानगरपालिकेत एक वर्षाच्या आतमध्ये नोंद केली नाही. त्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. संबंधित अर्जदारांनी जन्माचा सबळ पुरावा दाखल केला नाही. अर्जदाराचा सदर अर्ज खोटा व काल्पनिक आहे. अर्ज उशिरा दाखल करण्याबाबत ठोस कारण अर्जामध्ये नमूद नाही. जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्जदाराने शाळा सोडल्याचा दाखला, शिधापत्रिका, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, जनगणना अहवाल, अधिवास प्रमाणपत्र, दवाखान्याची कागदपत्रे पुरावा म्हणून या अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्जदाराचा अर्ज नामंजूर करावा, अशी विनंती मनपाने या पत्राद्वारे केली आहे. तर ५०० अर्जामध्ये अर्जदार यांनी जन्म मृत्यू कार्यालय, मनपा येथे जन्म-मृत्यू दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता, परंतु कार्यालयातील मूळ कागदपत्रे तपासली असता अर्जातील नमूद तारखेची नोंद आढळून आलेली नाही. मनपाने अहवालासोबत अर्जदारांची यादीही जोडली आहे.
सर्व प्रकरणांच्या फेरतपासणीसाठी समिती
उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांच्या कार्यालयाने निर्गमित केलेल्या जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांच्या आदेशाची फेरतपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही समिती स्थापन केली. पैठणचे उपविभागीय अधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असून, कन्नडचे तहसीलदार आणि पैठणचे नायब तहसीलदार हे या समितीचे सदस्य आहेत. ही समिती सर्व प्रकरणांची चौकशी करणार आहे.
व्यंकट राठोड यांच्यावर कारवाईची मागणी
संभाजीनगरचे छत्रपती उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड यांनी चुकीच्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्रे दिली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवा करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
आधारकार्ड रद्द करण्यासाठी दिल्लीत पत्र
महापालिकेने पोलिस आयुक्त आणि जिल्हा प्रशासनाला अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी १३२५ प्रमाणपत्रे बेकायदा पद्धतीने दिल्याचे म्हटले आहे. हे बेकायदा प्रमाणपत्र रद्द करावेत, त्यांचे आधारकार्डही रद्द करण्यात यावेत यासाठी मी शुक्रवारी दिल्लीत आध-ारकार्ड आयुक्तांना भेटून पत्र दिले आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.