

छत्रपती संभाजीनगर : बौद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या ऐतिहासिक धम्मध्वज यात्रेचे सोमवारी (दि. २५) शहरात स्वागत करण्यात आले. भन्ते विनाचार्य व भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो आणि भिक्खू संघाच्या नेतृत्वात क्रांती चौक ते बुद्धलेणी अशी धम्मध्वज यात्रा काढली. यात्रेच्या समारोपात आंदोलनाची पुढील दिशा चैत्यभूमी येथे २ सप्टेंबर रोजी ठरणार असल्याची माहिती भन्ते विनाचार्य यांनी दिली.
बौद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनासाठी कारावास भोगलेले भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली नागपूरच्या दीक्षा भूमीवरून निघालेली ऐतिहासिक धम्मध्वज यात्रा विविध जिल्ह्यांतून मार्गक्रमण करीत सोमवारी दुपारी १ वाजता शहरात पोहोचली. बौद्ध उपासक-उपासिकांनी यात्रेचे स्वागत केले. यावेळी भन्ते विनाचार्यांचे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी स्वागत केले. क्रांती चौकातून ही यात्रा पैठणगेट, औरंगपुरा, खोकडपुरा, मिलकॉर्नर, मिलिंद महाविद्यालय, विद्यापीठगेटमार्गे बुद्धलेणीवर पोहोचली.
बुध्दलेणीवर पोहोचल्यानंतर यात्रेचे सभेत रूपांतर झाले. यावेळी भन्ते विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा तीव्र करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. भन्ते विनाचार्य यांनी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे ही न्याय मागणी आहे. बिहार सरकार हिंदुत्ववाद्यांच्या दबावाखाली या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
ही यात्रा २ किंवा ३ सप्टेंबर रोजी चैत्यभूमीला पोहोचणार आहे. आंदोलनाची पुढील दिशा येथेच ठरणार असल्याचे सांगितले. अ.भा. भिक्खू संघ, सर्व पक्षीय आंबेडकरवादी पक्ष-संघटना आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे दीपक निकाळजे, कुंदन लाटे, धम्मा धन्वे, प्रांतोष वाघमारे, अमित वाहूळ, कपिल बनकर, विष्णू जगताप अरविंद कांबळे आदींनी परिश्रम घेतले.